ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना काळाच्या पडद्याआड

0

मुंबई : खलनायक, नायक, संन्यासी व राजकारणी असे चौरंगी आयुष्य जगलेले हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांचे गुरुवारी मुंबईत मूत्राशयाच्या कर्करोगाने सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी निधन झाले. गिरगाव येथील एचएन रिलायन्स फाउंडेशन व रिसर्च सेंटर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. कर्करोगाने पीडित असल्याने याच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मृत्युसमयी ते 70 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि चार अपत्ये असा परिवार आहे. अलिकडेच सोशल मीडियावर व्हायरल झालेले त्यांचे छायाचित्र पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. आजारपणामुळे खंगल्याने विनोद खन्ना यांना ओळखणेही कठीण झाले होते. प्रकृती अधिकच खालावत गेल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कर्करोगाशी त्यांची सुरु असलेली झुंज अखेर संपली. त्यांच्या निधनाने बॉलीवूडसह त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. विनोद खन्ना यांचा जन्म अखंडित भारतात पेशावर येथे 6 ऑक्टोबर 1946 रोजी झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंबीय भारतात आले होते. 1998 मध्ये ते पहिल्यांदा पंजाबमधील गुरदासपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. 2003 मध्ये तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते.

अनेक सुपरहिट चित्रपटांनी कारकीर्द गाजविली
विनोद खन्ना यांच्या कुटुंबात पत्नी गीतांजली यांच्यापासून मुलगा अक्षय व राहुल खन्ना तर पत्नी कविता यांच्यापासून मुलगी साक्षी व श्रद्धा असा परिवार आहे. मूत्राशयाच्या कर्करोगाने ते गेल्या वर्षभरापासून पीडित होते. एप्रिलमध्येच त्यांना एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि, अंतिम अवस्थेत असलेल्या या कर्करोगाने सकाळी 11.20 वाजता त्यांचा मृत्यू झाला. 1969मध्ये छोट्या भूमिकांपासून त्यांनी आपल्या बॉलीवूडमधील कारकिर्दीस सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मेरे सपने, इन्साफ, परवरिश, मुकद्दर का सिकंदर, कुर्बानी, दयावान, मेरा गाव मेरा देश, चांदणी, दी बर्निंग ट्रेन, अमर अकबर अन्थोनी, दयावान या चित्रपटांनी त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले. अखंडित भारतातील पेशावरमध्ये त्यांचा एका व्यापारी परिवारात जन्म झाला होता. फाळणीनंतर खन्ना कुटुंबीय मुंबईत आले व व्यापारात गुंतले. सेंट मेरी स्कूल मुंबई आणि सेंट झेविअर्स हायस्कूल दिल्ली, दिल्ली पब्लिक स्कूल येथे त्यांचे शिक्षण झाले. नाशिक येथील बार्नेस स्कूलमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. मुंबईतील सिद्धहम कॉलेजमधून त्यांनी बीकॉमची पदवी प्राप्त केली. नंतर त्यांनी अभिनयक्षेत्रात उडी घेतली व अभिनेता बनले. नायक म्हणून यशस्वी झाल्यानंतर काही चित्रपटांत त्यांनी खलनायकाचीही भूमिका साकारल्यात.

राजकीय अन् अध्यात्मक्षेत्रातही चमकले
चित्रपटांतील करिअर उंचीवर असतानाच त्यांनी 1982मध्ये अचानक बॉलीवूड सोडले व भगवान ओशो रजनीश यांच्या आश्रमात दाखल झाले. तेथे त्यांनी ओशोंचे शिष्यत्व पत्कारले. पाच वर्षे ते पुणे येथील रजनीश यांच्या आश्रमात होते. 1987 मध्ये विनोद खन्ना यांनी पुन्हा बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते राजकारणात उतरले. 1998 मध्ये त्यांनी पहिल्यांदा पंजाबमधील गुरदासपूर मतदारसंघातून लोकसभेत पाऊल ठेवले. 1999 व 2004च्या लोकसभा निवडणुकीतही ते याच मतदारसंघातून लोकसभेवर गेले. 2009च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रतापसिंग बाजवा यांनी त्यांचा पराभव केला. 2014मध्ये पुन्हा याच मतदारसंघातून ते विजयी झाले व लोकसभेत पोहोचले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सत्ताकाळात ते सांस्कृतिक व पर्यटन राज्यमंत्री होते. नंतर त्यांना परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्रीही बनविण्यात आले होते. मतदारसंघात सातत्याने गैरहजर राहण्याचा आरोपही त्यांचावर होत होता. तरीही त्यांची मतदारसंघात प्रचंड लोकप्रियता होती.

अनेक मान्यवरांकडून शोकसंवेदना व्यक्त
विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर पूत्र अक्षय, राहुल यांच्याहस्ते वरळी स्मशानभूमीत सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव चाहत्यांच्या अंत्यदर्शनासाठी मलबार हिल येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी शोकसंवेदना व्यक्त करून त्यांच्याप्रती श्रद्धांजली अर्पण केली. महानायक अमिताभ बच्चन यांनीही विनोद खन्ना कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. 1975मध्ये विनोद खन्ना यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 1999मध्ये त्यांना लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कारही मिळाला होता.