मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून शशी कपूर यांची प्रकृती खालावली होती. शशी कपूर यांचा जन्म 1938 मध्ये झाला होता. शशी कपूर हे दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे पुत्र, तर शोमॅन राज कपूर आणि अभिनेते शम्मी कपूर यांचे बंधू होते. शशी कपूर यांच्या पश्चात कुणाल कपूर, संजना कपूर आणि करण कपूर असा परिवार आहे.
116 चित्रपटांमध्ये भूमिका
शशी कपूर यांनी 1940 पासून बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत काम करायला सुरूवात केली होती. त्यांनी आतापर्यंत 116 सिनेमांमध्ये काम केले असून, त्यातील 61 सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली. पद्मभूषण पुरस्काराने नावाजलेल्या या अभिनेत्याला तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
अनेक भूमिका गाजल्या
शशी कपूर यांनी हिंदी तसेच इंग्रजी सिनेमांमध्येही काम केले आहे. निर्माते म्हणून त्यांनी जुनून (1978), कलियुग (1980), 36 चौरंगी लेन (1981), विजेता (1982), उत्सव (1984) या नावाजलेल्या सिनेमांची निर्मिती केली होती. तसेच 60 आणि 70 च्या दशकांत उन्होंने जब-जब फूल खिले, कन्यादान, शर्मिली, आ गले लग जा, रोटी कपडा और मकान, चोर मचाए शोर, दीवार, कभी-कभी आणि फकीरा या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या.
शशी कपूर यांचे गाजलेले चित्रपट
जब जब फूल खिले (1965), हसीना मान जाएगी (1968), शर्मिली (1971), चोर मचाये शोर (1974), दीवार (1975), प्रेम कहानी (1975), चोरी मेरा काम (1975), कभी कभी (1976), फकिरा (1976), सत्यम शिवम सुंदरम (1978), त्रिशूल (1978), दुनिया मेरी जेब मे (1979), काला पत्थर (1979), सुहाग (1979), शान (1980), सिलसिला (1981), नमक हलाल (1982).