ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांचा निर्घृण खून

0

कोल्हापूर । महाराष्ट्रातील प्रभावी वक्ते, ज्येष्ठ संशोधक आणि शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. कृष्णा किरवले यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ही घटना समजताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉ. किरवले एसएससी बोर्डाजवळील अरिहंत कॉलनीत राहत होते. त्यांच्या बेडरूममध्येच ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून केला गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा घातपात की आणखी काय, याबाबतची माहिती पोलिस घेत होते. दरम्यान, हे वृत्त शहरात वार्‍यासारखे पसरले. त्यानंतर विद्यापीठातील प्राध्यापक, आंबेडकरी चळवळीतील कायकर्ते आणि विद्यार्थ्यांनी डॉ. किरवले यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. या घटनेने चळवळीतील कार्यकर्त्यांना जबर धक्का बसला आहे. डॉ. किरवले आंबेडकरी चळवळीतील प्रभावी वक्ते होते. त्याबरोबरच संशोधन क्षेत्रातही त्यांचा दबदबा होता. शिवाजी विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी अनेक उपक्रम राबवले होते. आंबेडकरी चळवळीबरोबरच साहित्यविषयक विपूल लेखनही त्यांनी केले आहे.

विचारवंताच्या हत्येने कोल्हापूर पुन्हा चर्चेत
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष दिवंगत नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा छडा अद्याप लागलेला नसताना कृष्ण किरवले या विचारवंताचा अशाप्रकारे गूढ मृत्यू झाल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पानसरे यांची हत्या कोल्हापुरात झाली होती तेच कोल्हापूर किरवले यांच्या गूढ मृत्यूने पुन्हा चर्चेत आले. दरम्यान, फर्निचरचे पैसे न दिल्याच्या रागातून त्यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, पोलिस त्या दिशेने तपास करत होते. डॉ. किरवले यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून आंबेडकरांच्या विचारांचा देशभर जागर केला. त्यांनी औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेजमधून शिक्षण घेतले. त्यांच्यावर आंबेडकरी चळवळीचे संस्कार तेथेच झाले. 1967 पासून आंबेडकरी ऊर्जा देणार्‍या डॉ. गंगाधर पानतावणे संपादित अस्मितादर्श या वाङ्मयीन नियतकालिकातून त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली.

आंबेडकरी जनता स्वस्थ बसणार नाही : कवाडे
विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी डॉ. किरवलेंची ख्याती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या इंग्रजी लेखनात वापरलेल्या शब्दांची डिक्शनरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठात बनवण्यात आली होती. त्यांचा जन्म 4 मे 1954 ला बीड येथील शिरसाळा येथे झाला. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून 1987 ला पीएचडी केली आहे. डॉ. आंबेडकरी शाहिरी एक शोध, भारतीय साहित्याचे निर्माते : बाबुराव बागुल, दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश (संपादक) अशी त्यांची काही ग्रंथसंपदा आहे. याशिवाय, त्यांनी विविध दैनिकांतून, मासिकांतून विपूल लेखन केले आहे. त्यांनी दलित साहित्यांच्या अनुषंगाने संशोधनाचे मोठे काम उभे केले आहे. संशोधक विद्यार्थ्यांना त्यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळत असे. दरम्यान, पुरोगामी चळवळीतील नेते जोगेंद्र कवाडे यांनी घटनेचा निषेध केला असून, खुन्यांना लवकरात लवकर न पकडल्यास आंबेडकरी जनता स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपासकामाला दिशा दिली होती. घटनास्थळी जमा झालेल्या कार्यकर्त्यांच्या जमावाकडून जोरदार घोषणाबाजी सुरु होती. दरम्यान, पोलिसांनी संशयाच्या आधारे दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांची कसून चौकशी सुरु होती.