ज्येष्ठ काँग्रेस नेते एस. एम. कृष्णा भाजपच्या वाटेवर

0

नवी दिल्ली | काँग्रेसचे निष्ठावंत नेते एस. एम. कृष्णा यांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ते पक्षात कधी प्रवेश करणार हे अद्यापही निश्चित झालेले नाही. आम्ही लवकरच ते ठरवू. परंतु, ते भाजपमध्ये प्रवेश करणार हे शंभर टक्के खरे असल्याचे कर्नाटक भाजप अध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यापाल, माजी केंद्रीय मंत्री आणि गांधी घराण्याचे निष्ठावंत म्हणून एस एम कृष्णा ओळखले जातात. ८४ वय असलेले कृष्णा यांनी, वय जास्त असल्याने डावलले जात असल्याचा आरोप काही दिवसांपुर्वी काँग्रेस नेतृत्वावर केला होता.

एस एम कृष्णा यांनी काँग्रेसमधील दीर्घ कारकीर्दीत इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याबरोबर काम केले आहे. १९६८ साली ते लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर १९९९ मध्ये ते कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले. मनमोहन सिंग सरकारच्या काळात ते परराष्ट्र मंत्रीही होते. दरम्यान, कर्नाटक भाजप अध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी कृष्णा हे लवकरच भाजपमध्ये येणार असा दावा केला आहे.

मागील आठवड्यात कृष्णा यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसने मला सर्वकाही दिले. मी चांगला, वाईट काळ बघितला आहे, कडूगोड अनुभव घेतले आहेत. माझी काँग्रेसवरील निष्ठा अढळ होती. मात्र, काँग्रेसला आता लोकनेत्यांची गरज उरली नसून त्यांना फक्त मॅनेजर्स हवे आहेत. माझ्यासारख्या नेत्यांचे महत्त्व कमी झाले आहे. काँग्रेसमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांची अवहेलना केली जात आहे. माझे वय जास्त असल्याने मला डावलले जात असल्याचे कृष्णा यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगीतले होते.