वासिंद :- नागरीकरणामुळे वासिंद शहराचा झपाट्याने विकास होत असला तरी ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठेही नाना नानी पार्क किंवा बसण्यासाठी मोकळी जागा नसल्याने त्यांची परवड होत असल्याचे दिसुन येते. नाईलाजाने जेष्ठ नागरिकांना वासिंद रेल्वे स्थानकाच्या होम प्लाटफॉर्मचा आधार घ्यावा लागत आहे. शहराची लोकसंख्या विस ते पंचवीस हजाराच्या घरात पोहोचली असुन सर्वत्र विकासकामांना गती मिळत आहे. विकासक सर्वत्र तीन तीन मजल्याच्या इमारती बांधुन नवनवीन सोयसाटी व नगर तयार करत आहेत. परंतु अजुन पर्यंत एकही विकासकाने ज्येष्ठासाठी पार्क तयार केलेले नाही. काही ठिकाणी सिटी सर्व्हेच्या नकाशा नुसार खेळासाठी मैदान, बाग व इतर प्रयोजनासाठी मोकळे भूखंड ठेवण्यात आले होते. परंतु ग्रामपंचायतीच्या व प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे हे मोकळे भूखंड विकासकांच्या घशात गेल्याचे दिसुन येते. त्याचा नाहक त्रास जेष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे.
वृध्दांना रेल्वे स्थानकाचा आधार
वासिंदमध्ये हजाराच्या आसपास सदस्य संख्या असलेली जेष्ठ नागरिक संस्था कार्यरत आहे. ही संस्था नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवीत असते. ग्रामपंचायतीने या संस्थेला हॉलसुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. या हॉलमधील जागा कमी पडत असल्याने बहुतेक जेष्ठ नागरिक रेल्वे स्टेशनच्या होम प्लॅटफॉर्मचा आसरा घेत असल्याचे दिसुन येते. सायंकाळी पाच वाजेपासुन आठ वाजेपर्यंत जेष्ठ नागरिक प्लॅटफॉर्म एक वरील खुर्च्यावर मनमोकळंपणाने गप्पा गोष्टी करत सायंकाळचा वेळ आनंदात घालविताना दिसतात.
आम्हाला रेल्वे स्टेशनवर येऊन बसायला आनंद होत नाही. गावात कुठेही जागा नसल्याने रेल्वे स्टेशनच्या खुर्च्यांचा आधार घ्यावा लागतो. आम्ही सात आठ जण निवृत्त शिक्षक असुन एकमेकांना या निमित्ताने दररोज संध्याकाळी भेटतो. आमच्या सारखे अनेक जण येथे येतात.
डी .एस.पाटील ( जेष्ठ नागरिक)
वासिंद पूर्व भागात नाना नानी पार्क, खेळाचे मैदान व विविध प्रयोजनासाठी राखीव भूखंड ठेवण्यात आले होते. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. जेष्ठ नागरिकांसाठी निःशुल्क एक हॉल उपलब्ध करून दिलेला आहे.
राजेंद्र म्हसकर (सरपंच .ग्रामपंचायत,वासिंद )