पोलीस महासंचालकांचे आदेश : ज्येष्ठ नागरिक कक्षासह, सुरक्षा समितीची स्थापना
जळगाव : वैयक्तिक सुरक्षा, मालमत्ता संदर्भातील वाद, परिवाराकडून होणारा छळ, बॅँक, कोषागार व रेशन यासारख्या अनेक संकटे व अडचणींना ज्येष्ठ नागरिकांना सामोरे जावे लागते. या ज्येष्ठ नागरिकांना संकटे, अडचणींचा सामना करावा लागू नये, त्यांचे आयुष्य सुखकर व्हावे, यासाठी पोलीस विभागाने आवश्यक पावले उचचली आहेत. यानुसार या ज्येष्ठ नागरिकांचय मदतीसाठी नियंत्रण कक्षात 1090 या हेल्पलाईन क्रमांक राहणार असून 24 तास ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर ज्येष्ठ नागरिक सुरक्षा समितीची स्थापना करण्यात येणार असून ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.
आजच्या काळात घरांमध्येही ज्येष्ठ नागरिक एकटे राहण्याची संख्याही वाढली. एकटे राहण्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्या व संकटे निर्माण होत आहेत. त्यावर मात करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सुरक्षा समितीची स्थापना करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. 28 जानेवारी 2013 रोजी देखील असेच परिपत्रक तत्कालिन महासंचालकांनी काढले होते. आता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी याच पत्राचा आधार घेऊन जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी व उपविभागीय अधिकार्यांच्या नावाने आदेश काढून सुरक्षा समितीची स्थापना करुन त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यात दिल्या आहेत.
दिवसातून 5 ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घ्या..
पोलीस स्टेशन पातळीवर स्थापन करण्यात येणार्या सुरक्षा समितीची बैठक पोलीस उपअधीक्षक यांनी महिन्यातून किमान एकदा तरी घ्यावी, तसेच पोलीस ठाणे स्तरावर अधिकारी व कर्मचार्यांनी दिवसातून किमान पाच ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घ्याव्यात. त्यांना येणार्या अडचणींबाबत मार्गदर्शन व सहाय्य करणे अपेक्षित असल्याचेही आदेशात म्हटले आहे.
पोलीस स्टेशन स्तरावर ज्येष्ठ नागरिक कक्ष
पोलीस स्टेशन स्तरावर ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात यावा. ही जागा ज्येष्ठ नागरिकांना पोहचण्यासाठी सुकर असावी. वरच्या मजल्यावर असल्यास तेथे लिफ्टची सोय असावी. अति वयोवृध्द व दिव्यांगासाठी रॅम्प असावा. पोलीस निरीक्षक किंवा सहायक निरीक्षक या कक्षाचे प्रमुख असतील. जिल्हा घटकासाठी सहायक पोलीस निरीक्षक, महिला सहाय्य कक्ष यांची या कक्षाच्या प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी पोलीस निरीक्षक, कम्युनिटी पोलिसींग (जिल्हा विशेष शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे अपेक्षित आहे.
यात काम करणार्या अधिकारी व कर्मचार्यांचा दृष्टीकोन परोपकारी असावा, त्यांचे उत्कृष्ट संभाषण असावे. सामाजिक किंवा मानसशास्त्राचे पदवीधर असणाजया कर्मचार्यांना या कक्षात प्राधान्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या कक्षात ज्येष्ठ नागरिक वैयक्तिक येवू शकतात, किंवा हेल्पलाईन किंवा अर्जाद्वारेही मदत मागू शकतात. वैद्यकिय सेवा, तात्पुरता आसरा यासाठी एनजीओंची मदत घेण्यात यावी.