ज्येष्ठ नाट्यसमीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांचे निधन

0

पुणे : ज्येष्ठ नाट्यसमीक्षक व लेखक डॉ. वि. भा. देशपांडे (वय 79) यांचे एरंडवणे येथील राहत्या घरी गुरुवारी अल्पसा आजाराने निधन झाले. डॉ. देशपांडे यांच्या मागे मुलगी, जावई, नातू, पुतण्या, असा परिवार आहे.

डॉ. देशपांडे गेला आठवडाभर दवाखान्यात होते. गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले. दुपारी एकच्या सुमारास त्यांचे पार्थिव एरंडवण्यातील निवासस्थानी व त्यानंतर दुपारी चारला महाराष्ट्र साहित्य परिषदेत ठेवण्यात आले. रंगकर्मी माधव राजगुरू, कवी उद्धव कानडे, डॉ. न. म. जोशी, ह. ल. निपुणगे, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि अन्य पदाधिकारी आदींनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत डॉ. देशपांडे यांच्यावर कोणतेही धार्मिक विधी न करता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, डॉ. मोहन आगाशे, रंगकर्मी योगेश सोमण, गायक रघुनंदन पणशीकर, साहित्यिक राजन खान आदी मान्यवर उपस्थित होते.

पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात 35 वर्षे मराठी आणि नाट्यशास्त्राचे प्राध्यापक होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांनी मराठी नाट्यकोश या 1200 पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून मराठी कोशवाङ्मयात मोलाची भर टाकली. त्यांनी अनेक पुस्तके संपादित केली, तसेच स्वतंत्र लेखन केले. संपादित व स्वतंत्र अशी एकूण 43 पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.

मराठी आणि भारतीय स्तरावरचा पहिला नाट्यकोश, ’मराठी नाटक- नाटककार काळ आणि कर्तृत्व’ याचे 3 खंड, रंगयात्रा, आचार्य अत्रे : प्रतिमा आणि प्रतिभा, पु.ल. पंच्याहत्तरी, गाजलेल्या रंगभूमिका, माझा नाट्यलेखन- दिगदर्शनाचा प्रवास अशी अनेक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. निळू फुले- व्यक्ती, कार्यकर्ता, कलावंत अशा अनेक पुस्तकांचे त्यांनी संपादन केले होते. नाट्यदर्पण व नाट्यगौरव पुरस्कार तसेच, पुणे व पिंपरी- चिचंवड महापालिकेच्या जीवनगौरव पुरस्कारांसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते.

इंदिरा-भालचंद्र पुरस्कार
डॉ. देशपांडे यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ दरवर्षी एका ग्रंथाला ‘इंदिरा-भालचंद्र पुरस्कार’ देण्यात येतो. 2016 मध्ये हा पुरस्कार रत्नाकर मतकरी यांना त्यांच्या ‘माझे रंगप्रयोग’ या पुस्तकासाठी देण्यात आला. दहा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी विजया मेहता (झिम्मा), डॉ. अजय वैद्य (मास्टर दत्ताराम नाट्यवीर) व मोहन जोशी (नट-खट) यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

संंदर्भग्रंथ हरपला
आमच्यातला संदर्भग्रंथ हरपला आहे. संपूर्ण नाट्य परंपरेची समग्र माहिती असलेली तसेच आवडीने लिखाण करणारी चांगला व्यक्ती आपल्यातून निघून गेली आहे. त्याने सर्वासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. त्याने कधीच खळबळजनक विधान करून प्रसिद्धी मिळवली नाही.
– डॉ. मोहन आगाशे (ज्येष्ठ अभिनेते)

मोलाचे योगदान
मराठी रंगभूमीसाठी 70 ते 80 चे दशक हे सुर्वणकाळ होते. त्या सुर्वणकाळाचे अनेक साक्षीदार हळूहळू नाहीसे होत असून, माझ्यासारख्या त्या काळात वावरणार्‍या माणसाला ही हादरून दाकणारी गोष्ट आहे. आपल्या संस्कृतीचा इतिहास जतन करण्यासाठी वि. भा. देशपांडे यांचे मोलाचे योगदान आहे.
– अमोल पालेकर (ज्येष्ठ अभिनेते, दिर्ग्दशक)