ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसमधील सर्व पदांसह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा

Shocking : Senior Leader Ghulam Nabi Azad Out Of Congress नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसमधील सर्व पदांसह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. राजीनाम्याच्या पाच पानी पत्रात आझाद यांनी काँग्रेसह पक्षाच्या नेतृत्वावर धक्कादायक आरोप करून विचार मंथन करण्यास पक्ष नेतृत्वाला भाग पाडले आहे. काँग्रेसने इच्छाशक्ती आणि क्षमता दोन्हीही गमावले असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

खाजगी सचिवांसह सुरक्षा कर्मचारी घेतात निर्णय
काँग्रेसमध्ये सोनिया गांधी केवळ नाममात्र आहेत. सर्व महत्त्वपूर्ण निर्णय राहुल गांधींकडूनच घेतले जात होते. यापेक्षा वाईत शब्दांत सांगायचं तर त्यांचे सुरक्षा कर्मचारी आणि खासगी सचिव निर्णय घेत होते, असा गंभीर आरोप गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. भारत जोडो यात्रा सुरू करण्यापूर्वी काँग्रेस नेतृत्वाने देशभरात काँग्रेस जोडो अभियान सुरू केले पाहिजे. यावेळी गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधींवरही टीका करत आरोपांची फैर झाडली. ते म्हणाले की, जेव्हापासून राहुल गांधींचा राजकारणात प्रवेश झाला आहे आणि 2013 मध्ये त्यांची काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली, तेव्हापासून त्यांनी काँग्रेसमध्ये आधीपासून असलेल्या जुन्या सल्लागार तंत्राला नष्ट केले. तसेच सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी लोकांना बाजूला केले.

काँग्रेसचे पुनरागमन अशक्य
आझाद यांनी आपल्या पाच पानांच्या राजीनामा पत्रामध्ये लिहिले की, सध्या राहुल गांधी हे अननुभवी लोकांच्या कोंडाळ्यात घेरले गेलेले आहेत. काँग्रेस पक्ष आता अशा स्थितीत पोहोचला आहे जिथून पुनरागमन करणे कठीण आहे. संपूर्ण संघटनात्मक प्रक्रिया केवळ एक देखावा आहे. देशात कुठेही संघटनात्मक पातळीवर निवडणुका झालेल्या नाही. 24 अकबर रोड येथे बसून पक्ष चालवणार्‍या चापलूस मंडळींना तयार केलेल्या याद्यांवर हस्ताक्षर करण्यासाठी एआयसीसीच्या निवडक लेफ्टिनंटना भाग पाडले जात आहे, असा आरोपही आझाद यांनी केला आहे.