ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश ; काँग्रेसला धक्का

0

कोल्हापुर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून राष्ट्रवादीचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले.

डॉ. डी. वाय. पाटील यांचं शिक्षण क्षेत्रात मोठं नाव असून कोल्हापुरातल्या राजकारणातही त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. त्यांचे सुपुत्र सतेज पाटील यांचे राजकीय विरोधक मानले जाणारे धनंजय महाडिक हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. तर, सतेज पाटील हे काँग्रेसचे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी त्यांचे चुलत भाऊ अमल महाडिक यांचा प्रचार केला होता. परिणामी सतेज पाटील यांचा पराभव झाला होता. त्यामुळे मुलाचा मुख्य विरोधक ज्या पक्षात आहे, त्याच पक्षात डॉ. डी. वाय. पाटील यांनी प्रवेश केला असल्याने कोल्हापूरसह राज्यातील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

डी. वाय. पाटील हे 2009 ते 2013 या काळात त्रिपुरा, तर 2013 ते 2014 या काळात बिहारचे राज्यपालही होते. याशिवाय, त्यांच्याकडे पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचाही कार्यभार काही काळासाठी होता. 1957 ते 1962 या काळात ते काँग्रेसकडून कोल्हापूरचे महापौर होते. 1967 आणि 1972 साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत आमदार म्हणूनही निवडून गेले होते.

दरम्यान, डी वाय पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाने राष्ट्रवादीच्या वाढीस मतदच होईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.