ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवलकरांचे निधन

0

मुंबई । ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक गोविंद तळवलकर यांचे वृद्धापकाळाने अमेरिकेत निधन झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे अमेरिकेत वास्तव्य होेते. मराठीसह इंग्रजी भाषेतील स्तंभलेख आणि अग्रलेखांसाठी गोविंद तळवलकर यांचे नाव प्रसिद्ध होेते. ते अनेक वर्षे लोकसत्तामध्ये सहसंपादक होते. त्याशिवाय त्यांनी महाराष्ट्र टाइम्सचे संपादक म्हणून तब्बल 28 वर्षे काम पाहिले. टाइम्स ऑफ इंडिया, इलूस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, रॅडिकल ह्युमनिस्ट, फ्रंटलाइन, अशा इंग्रजी वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांतूनही तळवलकरांनी लेखन केले.

महाराष्ट्र टाइम्सला महाराष्ट्रातील एक प्रभावी, परिणामकारक दैनिक म्हणून घडवण्यात तळवलकरांचा सिंहाचा वाटा होता. त्यांचे बरेचसे लिखाण पुस्तकरूपाने प्रकाशित झाले आहे. गोविंद तळवलकरांच्या पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांनी 1947 साली बी.ए. झाल्यानंतर शंकरराव देव यांच्या नवभारतमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढे 1950 ते 1962 अशी बारा वर्षे ते लोकसत्तामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत होते. 1962-67 च्या दरम्यान त्यांना महाराष्ट्र टाइम्समध्ये काम करण्याची संधी मिळाली. 1968 मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि पुढे 1996 पर्यंत म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस वर्षे ते महाराष्ट्र टाइम्सचे संपादक होते.

त्यांचे प्रकाशित साहित्यः
अग्निकांड :- युद्धाच्या छायेत या स्तंभलेखनाचा पुस्तकरूपी संग्रह, अफगाणिस्तान, अभिजात (1990)
अक्षय (1995), इराक दहन :- सद्दाम हुसेन यांच्या पाडावाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात अमेरिकेने पुकारलेल्या लढ्याचा ताळेबंद, ग्रंथ सांगाती (1992), डॉ. झिवागोचा इतिहास (लेख ललित दिवाळी अंक, 2015), नेक नामदार गोखले, नौरोजी ते नेहरू (1969), परिक्रमा (1987), पुष्पांजली (व्यक्तिचित्रे, मृत्यूलेख संग्रह), प्रासंगिक, बदलता युरोप (1991), बहार, बाळ गंगाधर टिळक (1970), मंथन, वाचता वाचता (पुस्तक परीक्षणांचा संग्रह, खंड 1, 2) (1979,92), शेक्सपिअर – वेगळा अभ्यास (लेख – ललित मासिक, जानेवारी 2016), सत्तांतर (खंड 1-1977 , 2-1983, व 3-1997), सोव्हियत साम्राज्याचा उदय आणि अस्त (खंड 1 व 2), पुरस्कार, उत्कृष्ट पत्रकारितेचे दुर्गा रतन व रामनाथ गोयंका पुरस्कार, न. चिं केळकर पुरस्कार (सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त पुस्तकासाठी) इ.स. 2007 चा जीवनगौरव पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार.

तळवलकरांच्या निधनाने ‘वैचारिक व्यासपीठ’ हरपले – शरद पवार
गोविंद तळवलकर यांच्या निधनाने आपण एका प्रगल्भ संपादकाला मुकलो आहोत. त्यांच्या निधनाने एक वैचारिक व्यासपीठ हरपले आहे, अशी भावना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार, राजकीय घडामोडींचे साक्षेपी विश्‍लेषक आणि लेखक गोविंद तळवलकर यांचे बुधवारी अमेरिकेतील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेतील एका पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होताना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे तळवलकर यांना श्रद्धांजली वाहिली. पाश्‍चिमात्य विचारवंतांच्या विचारांशी गोविंदरावांचा विशेष घरोबा होता. भारतातल्या विद्वानांशीही त्यांचा अखंड सुसंवाद असे. यशवंतराव चव्हाण, लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. गोवर्धनदास पारेख, अ. भि. शाह यांच्यापासून पु. ल. देशपांडेंपर्यंत त्यांचा गोतावळा मोठा होता, असे पवार यांनी म्हटले तसेच त्यांनी लिहिलेले अग्रलेख एकेकाळी चर्चेचा विषय असत. 1978 ला त्यांनी लिहिलेला अग्रलेख ‘हे राज्य जावे ही श्रींची इच्छा’ किंवा ‘संन्याशाचा सदरा’ अशा अनेक अग्रलेखांची सर्वसामान्यांमध्ये चर्चा होत असे. देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास असो किंवा न्या. रानडेंचे विचारदर्शन या संदर्भातले त्यांचे लिखाण हे सखोल आणि अभ्यासपूर्ण असल्याचे पवार यांनी सांगितले.