एरंडोल । येथील माजी उपनगराध्यक्षा तथा ज्येष्ठ पत्रकार शकुंतला शिवाजीराव अहिरराव यांना सौदामिनी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्यासह राज्यातील महिला पत्रकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला पत्रकारांच्या राष्ट्रीय संमेलनात पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले अध्यक्षस्थानी होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे होते. संमेलनात देशभरातील महिला पत्रकार सहभागी झाल्या होत्या. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महिला पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. महिला पत्रकारांनी निष्पक्षपणे बातम्या देऊन समाजात जनजागृती करावी असे आवाहन केले. यावेळी आमदार मंदा म्हात्रे ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर, नितीन केळकर, शिल्पा देशपांडे, शीतल कडे यांची उपस्थिती होती.