ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ, प्राच्यविद्या पंडित डॉ. ढवळीकर यांच्या पद्मश्रीचा शासनाला विसर

0

पुणे । पद्म सन्मान मिळालेल्या मान्यवराचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याचा प्रघात आहे. ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर त्यामुळेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाल्याचे स्पष्टीकरण सरकारने अलिकडेच दिले होते. मात्र, ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ आणि प्राच्यविद्या पंडित पद्यश्री डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याला शासनाला विसर पडला आहे.

पुणेकरांनी व्यक्त केली नाराजी
पुरातत्व शास्त्राची मुहूर्तमेढ रोवणारे आणि या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी मार्गदर्शक असणारे डॉ. मधुकर ढवळीकर यांचे 27 मार्च रोजी पुण्यात निधन झाले. डॉ. ढवळीकर यांना 2011 मध्ये पदमश्रीने सन्मानित करण्यात आले होते. तरीही शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले नाहीत. पद्म पुरस्कारप्राप्त मान्यवराचे निधन झाल्यावर त्यासंबंधीची माहिती जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयाला कळवायची असते. कोणकोणत्या व्यक्तींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करायचे आहेत याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. त्यांनी तारतम्य दाखवून यासंबंधी निर्णय घ्यायचा असतो. मात्र, ढवळीकर यांच्या अंत्यसंस्काराबाबत मुख्यमंत्र्यांनी हे तारतम्य दाखविले नसल्याने पुणेकरांमध्ये नाराजी आहे.

श्रीदेवीसाठी मुख्यमंत्र्यांची तत्परता
पद्मश्रीने गौरवण्यात आल्यामुळे श्रीदेवीला शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आल्याचा अंदाज काहींनी वर्तवला होता. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून ही कार्यवाही झाली होती. त्याचा पद्म पुरस्काराशी काही संबंध नव्हता, अशी माहिती आता समोर आली आहे. श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे तोंडी आदेश मुख्यमंत्र्यांनी 25 फेब्रुवारी रोजी दिले होते. तसे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आणि मुंबई पोलीस महासंचालकांना कळवण्यात आले होते, असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबत अर्ज महाराष्ट्र शासनाच्या राजशिष्टाचार विभागाकडे केला होता. अभिनेत्री श्रीदेवी यांचे गेल्या महिन्यात, 24 फेब्रुवारी रोजी दुबईतील एका हॉटेलमध्ये निधन झाले होते. त्यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडाल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले होते. त्यांच्या शरीरात अल्कोहोलचा अशंही सापडला होता.