पुणे : ज्येष्ठ व्यंगचित्रकार, नाट्यसमीक्षक मंगेश तेंडुलकर यांचे सोमवारी (10 जुलै) रात्री साडेदहा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास वैकुंठ स्माशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी सर्व क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. सामाजिक क्षेत्रावर व्यंगचित्र रेखाटणारे व्यक्तीमत्व काळाच्या पद्याआड गेल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. तेंडुलकर यांचे 90वे व्यंगचित्रप्रदर्शन नुकतेच बालगंधर्व कलादालनात पार पडले होते. रेषांच्या फटकार्यांसोबत त्यांनी विविध वर्तमानपत्रे, नियतकालिकांमधून ललित लेखनही केले होते.
विविध पुरस्कारांनी सन्मान
मंगेश तेंडुलकर यांचा जन्म 14 मे 1939 मध्ये झाला. प्रसिद्ध साहित्यिक नाटककार विजय तेंडुलकर व अर्थतज्ज्ञ डॉ. सुरेश तेंडुलकर यांचे ते बंधू होते. तर इतिहास संशोधक महेश तेंडुलकर हे त्यांचे पुत्र. व्यंगचित्र हा त्यांचा छंद होता. वैद्यकीय उपचारांसाठी तसेच हॉस्पिटलसाठी लागणारी उपकरणे बनविणे हा त्यांचा मूळ व्यवसाय होता. त्यांनी स्वतःच्या मृत्यूचेही व्यंगचित्र रेखाटले होते. 1954 पासून तेंडुलकरांनी कागदावर व्यक्तीरेषा काढण्यास सुरुवात केली आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे व्यंगचित्रांवर प्रेम कायमच राहिले. वाढते दारिद्य्र, शहरातील टेकडीफोड, वाहनांचा गोंगाट, रस्त्यांची दुर्दशा, मोबाईलच्या गमती-जमती अशा गंभीर अन् हलक्या-फुलक्या विषयांवरील वेगळा विचार देणारी त्यांची व्यंग्यचित्रे सर्वांना आवडली. त्यांच्या व्यंगचित्र प्रदर्शनांना मोठा प्रतिसाद मिळत असे. भुईचक्र, संडे मूड, कार्टुन ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. संडे मूड या पुस्तकासाठी त्यांनी वि. मा. दी. पटवर्धन पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा चिं. वि. जोशी पुरस्कारही मिळाला होता.
विविध मान्यवरांकडून शोकसंवेदना व्यक्त
महापौर मुक्ता टिळक, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, वाहतूक पोलिस उपायुक्त अशोक मोराळे, व्यंगचित्रकार चारुहास पंडित, मुरुली लाहोटी यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने तेंडूलकरांच्या अंत्यविधीला हजेरी लावली. त्यांच्या निधनामुळे समाजात एक पोकळी निर्माण झाली असून, त्यांचे प्रत्येक सामाजिक घटकावरील व्यंगचित्र हे कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत महापौर मुक्ता टिळक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आजवर अनेक व्यक्ती सामाजिक क्षेत्रात काम करताना आपण पाहिल्या. मात्र त्यातील मंगेश तेंडुलकर हे वेगळे होते. त्यांची व्यंगचित्रे ही कायम अमर राहतील आणि पुढच्या पिढीला संदेश देतील, अशा भावना पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केल्या. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, व्यंगचित्राच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रावर त्यांनी मार्मिक टिपण्णी केली असून, त्यांचे व्यंगचित्र हे एखाद्या लेख किंवा कविता एवढी प्रभावी असायचे. आज आपल्यातून सरस्वतीचा पुत्र गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
स्वतःच्या मृत्यूवरही काढले होते व्यंगचित्र
शेवटच्या दिवसांमध्येही तेंडुलकरांचे व्यंगचित्र काढणे सुरूच होते. 1954 मध्ये त्यांनी पहिले व्यंगचित्र काढले होते. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या मृत्यूवरही व्यंगचित्र काढले होते. तेंडुलकर नाट्यसमीक्षकही होते. विनोदी आणि थोड्या तिरकस शैलीतील त्यांची नाट्य समीक्षा वाचनीय आहे. पुण्याची वाहतूक समस्या, पर्यवरणाचा प्रश्न हे तेंडुलकरांचे जिव्हाळ्याचे विषय होते. केवळ व्यंगचित्र काढून, ब्रश आणि शब्दाचे फटकारे मारून तेंडुलकर स्वस्थ बसले नाहीत. ते भूमिका घ्यायचे. पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात पीएमटीचे नामकरण त्यांनी पुणे मृत्यलोक ट्रान्स्पोर्ट असे केले होते. असे असले तरी आणि याच पीएमटी किंवा आताच्या पीएमटीच्या कारभाराबाबत तेंडुलकरांनी ब्रशने फटकारे मारले असले तरी दरवर्षी दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेला ते न चुकता वयाच्या सत्तरीतही कर्वे रोडवरील नळस्टॉप चौकात भर उन्हात उभे राहून शुभेच्छा पत्रांचे वाटप करून वाहतूक नियमांविषयी जनजागृती करायचे. पुणे वाहतूक पोलिसांसोबतही तेंडुलकरांनी कार्टून्सद्वारे जनजागृतीच्या अनेक मोहिमा राबवल्या म्हणूनच तेंडुलकरांना अखेरचा निरोप द्यायला वैंकुठात राजकीय, सामाजिक, कला क्षेत्रातील मंडळींसोबत पोलिस कर्मचारी आवर्जुन उपस्थित होते.
पुस्तके
भुईचक्र
संडे मूड : (53 लेख आणि जवळपास तेवढीच व्यंगचित्रे असलेले पुस्तक)
पुरस्कार
संडे मूड’ पुस्तकासाठी शासनाचा वि.मा.दी. पटवर्धन पुरस्कार
मसापचा चिं. वि. जोशी पुरस्कार