मुंबई । ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळ दुखंडे यांचे आज (मंगळवारी) सावंतवाडी येथे निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी उर्मिला, कन्या सोनाली आणि दोन मुले संतोष आणि संदीप असा परिवार आहे. दुखंडे सरांच्या पार्थिवावर आणि उद्या, बुधवारी संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या 11/101, सिद्धार्थ नगर नंबर 5 प्रबोधन क्रीडा भवन समोर,गोरेगाव (प) मुंबई येथील घरापासून अंत्ययात्रा निघेल.
कणखर नेतृत्वाची कहाणी
प्रा. गोपाळ दुखंडे यांचे वडील गिरणी कामगार होते. त्यामुळे लहानपणापासूनच संघर्ष करत दुखंडे सरांनी आपले शिक्षण पूर्ण केले. गोरेगावहुन ते सकाळी भिवंडी कॉलेजला नोकरीसाठी जात असत आणि तिथून सुटल्यानंतर जनता दल, छात्रभारती आणि इतर सामाजिक, राजकीय कामांसाठी वेळ देत असत. युक्रांद या युवक चळवळीमधून दुखंडे सरांनी कामाला सुरुवात केली होती. कोकणाच्या प्रश्नावर प्रचंड आस्था असलेले ते नेते होते. परळच्या दामोदर हॉलच्या पटांगणात त्यांनी कोकणी बाजार पेठ भरवली होती. कोकण रेल्वे सुरू करण्याकरता झालेल्या प्रत्येक आंदोलनात दुखंडे सर अग्रस्थानी होते. कोकणातील मुलाला कोकण रेल्वेमध्ये नोकरी मिळावी म्हणून अभिजीत हेगशेटये, युयुत्स्य आर्ते या छात्रभारतीच्या मुलांना घेऊन त्यांनी कोकण रेल्वे जनाधिकार समितीची स्थापना केली होती.
राजकीय वाटचाल
दुखंडे सर हे प्रा.मधू दंडवते यांचे ते निकटचे सहकारी होते. मालवण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 1995 साली नारायण राणे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. तसेच मुंबई विद्यापीठात ते सिनेटचे सदस्य होते. मुंबई विद्यापीठाचा कारभार मराठीत चालावा याचा ते प्रत्येक सभेत दुखंडे सर आग्रह धरत असत. कोकणामध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र झाले पाहिजे, यामागणीसाठी त्यांनी छात्रभारती या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून जोरदार आग्रह धरला आणि रत्नागिरी येथे ते उपकेंद्र मंजूर करूनही घेतले. छात्रभारतीच्या मुंबईच्या कामात त्यांनी सुरुवातीपासूनच लक्ष घातले होते. कपिल पाटील, शरद कदम या त्यावेळच्या विद्यार्थी नेत्यांना हाताशी धरून सरांनी अनेक आंदोलने उभी केली.
सरांची आंदोलने
रात्र शाळेतील विद्यार्थ्यांचा छात्रभारतीने काढलेला रात्रीचा पहिला बॅटरी मोर्चा, त्यावेळचे महापालिका उपायुक्त गो. रा.खैरनार यांना घेऊन रुईया कॉलेजच्या नाक्यावर कुलगुरू डॉ.कर्णिक यांच्या विरोधात केलेले आंदोलन, गिरणी कामगारांच्या लढाईत दत्ता इस्वलकर यांच्या नेतृत्वा खाली काढलेला चड्डी-बनियान मोर्चा, भारतमाता सिनेमा वाचवण्यासाठी झालेले आंदोलन, नामांतर लढा, मंडल आयोग स्थापन करण्यासाठी झालेल्या प्रत्येक लढाईत प्रा.दुखंडे सर कायमच पुढे असत. जनता दलाचे ते काही काळ प्रदेश सेक्रेटरी होते. दरम्यान, काही वर्षांपूर्वी ते सावंतवाडीत स्थायिक झाले होते. या वयातही ते सिंधुदुर्गात होणार्या सगळ्या कार्यक्रमात हजेरी लावत असत. मुंबई असताना अरविंद सावला त्यांची काळजी घेत होते.
प्रा.गोपाळ दुखंडे सरांनी आमच्यासाठी आणि या चळवळीसाठी खूप करून ठेवले आहे. समाजातील प्रश्नाबाबत सतत अस्वस्थ असणारा तळमळीचा समाजवादी नेता आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्या जाण्याने व्यक्तीशः माझी आणि पुरोगामी चळवळीची खूप हानी झाली आहे.
शरद कदम, कार्याध्यक्ष,राष्ट्र सेवा दल, मुंबई