ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भिलारे गुरुजी यांचे निधन

0

सातारा : महात्मा गांधी यांच्यावर झालेला चाकूहल्ला परतवून लावणारे सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार भि. दा. भिलारे ऊर्फ भिलारे गुरुजी यांचं बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास वृद्धापकाळानं निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. दुपारच्या सुमारास त्यांच्यावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भिलारे गुरुजींचा जन्म महाबळेश्वरजवळच्या भिलार गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. सुरुवातीच्या काळात प्राथमिक शिक्षक असलेले भिलारे हे संपूर्ण महाराष्ट्रात गुरुजी म्हणूनच परिचित होते. ब्रिटिशांच्या विरोधात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सुरू केलेल्या ’प्रति सरकार’मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. भूमिगत राहून पत्रकं वाटण्याचं काम ते करत. महात्मा गांधी, साने गुरुजी यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. या दोघांसोबत त्यांनी अनेक सेवा कार्यात सहभाग घेतला होता. 1944 च्या जुलै महिन्यात महात्मा गांधी यांच्यावर नथुराम गोडसे व त्याच्या साथीदारांनी केलेला चाकूहल्ला त्यांनी परतवून लावला होता. गुरुजी यांनी त्यावेळी नथुरामला पकडून दिले होते.

नंतरच्या काळात ते राष्ट्र सेवा दलातही सक्रिय झाले. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले. ग्रामोन्नती संघ, सर्वोदय योजनांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कामांचा डोंगरच उभा केला. 1962 ते 1980 अशी तब्बल 18 वर्षे ते आमदार होते. त्यापैकी 12 वर्षे त्यांनी जावली तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. तर, 6 वर्षे विधान परिषदेवर होते. आमदार म्हणून त्यांनी जावली तालुक्यातील अनेक प्रश्नांची तड लावण्यात यश मिळवले. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.

गांधी युगाचे प्रत्यक्ष साक्षीदार, महात्मा गांधीजींवर नथुराम गोडसेंनी केलेल्या हल्ल्याचा प्रतिबंध करणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भि. दा. भिलारे गुरुजी यांच्या निधनाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा ज्येष्ठ व जुना मार्गदर्शक हरपला आहे. या शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
खा. अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया