लखनऊ: देशातील ज्वलंत मुद्द्यावरून जनतेचे लक्ष भरकटविण्यासाठी भाजप सरकार जिल्हा आणि शहरांची नावे बदलत आहे, अशा शब्दांमध्ये गुजरातचे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी भाजपावर टीका केली आहे.
सीबीआयमधील अंतर्गत वाद, राफेल घोटाळा, आरबीआयची स्वायत्तता असे अनेक गंभीर विषय सध्या देशासमोर आहेत. मात्र या मुद्यांपासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी आता राम मंदिराचा मुद्दा रेटला जात आहे. भाजपा आणि संघाकडून देशातील वातावरण गढूळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशा शब्दांमध्ये हार्दिक यांनी भाजपावर तोफ डागली. फक्त जागांची नावं बदलून देश संपन्न होणार असेल, तर 125 कोटी भारतीयांचं नाव बदलून राम ठेवा, असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजपाला निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराची आठवण झाल्याचे हार्दिक पटेल म्हणाले. राम मंदिराचा वापर भाजपाकडून केवळ मतांसाठी सुरू आहे. गुजरातच्या प्रत्येक गावात रामाचं मंदिर आहे. मात्र रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत रामाचं मंदिर नाही, असं हार्दिक यांनी म्हटलं. भाजपाला केवळ निवडणुकीपुरती रामाची आठवण होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
उत्तर प्रदेशातील योगी सरकारनं काही दिवसांपूर्वीच अलाहाबाद आणि फैजाबादचं नामांतर केलं. अलाहाबादला प्रयागराज आणि फैजाबादला अयोध्या नाव देण्याच्या प्रस्तावाला उत्तर प्रदेश सरकारनं मंजुरी दिली. यावरुन हार्दिक पटेल यांनी सरकारवर निशाणा साधला. मुलभूत प्रश्नांपासून लोकांचं लक्ष विचलित व्हावं, यासाठी सरकार नामांतराचे उपद्व्याप करत असल्याची टीका त्यांनी केली. उत्तर प्रदेशात बेरोजगारी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हजारो तरुणांकडे रोजगार नाहीत, असे हार्दिक पटेल यांनी सांगितले.