झडतीत संशयितांकडून मिळाले मारहाणीसाठी वापरलेले फायटर

0

जळगाव। बेंडाळे चौकात गुरूवारी रात्री दोन मोटारसायकलस्वार तरुणांनी एका पादचार्‍याला बांबूने मारहाण केली होती. त्यात पादचार्‍याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी शनिवारी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. यातच त्यांच्या कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना मारहाणीत वापरलेले फायटर मिळून आले असून ते पोलिसांनी जप्त केले आहे.

डोक्यात मार बसल्यामुळे मेंदूत अतिरक्तस्त्राव होऊन तरूणाचा मृत्यू
तुकाराम वाडीतील संदीप दत्तात्रेय वाणी (बोरसे, वय 22) आणि अल्पवयीन युवक हे दोघे गुरूवारी रात्री हळदीच्या कार्यक्रमातून परत जात असताना बेंडाळे चौकात एका पादचार्‍याला त्यांच्या दुचाकीचा कट लागला. त्यावरून त्यांच्यात वाद होवून दोघांनी त्यात तरूणाला बेदम मारहाण केली. मात्र दोघांनी त्याला बांबूने व फायटरने मारहाण केली. त्यात जखमी अवस्थेत तो शुक्रवार सकाळपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ असलेल्या वाचनालयाच्या भिंतीजवळ पडून होता. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. यानंतर डोक्यावर मारहाण केल्याने मेंदूत अतिरक्तश्राव झाल्याने तसेच पोटात बेदम मारहाण केल्याने तरूणाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसात खुनाचा गुन्हा शनिवारी दाखल झाला. संदिप वाणी या संशयिताला शुक्रवारीच ताब्यात घेण्यात आले होते तर संशयित अल्पवयीन युवकाला पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले आहे. त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली.

दोन ते तीन वर्षाची ओळख
संशयित अल्पवयीन युवक हा मध्यप्रदेशातील बर्‍हाणपुर येथील इच्छापूर येथील मुळचा रहिवासी असून घटना घडल्यानंतर तो आई-वडीलांकडे इच्छापूर येथे निघून गेेला होता. शनिवारी मात्र लहान भावासोबत जळगावात आल्यानंतर पोलिसांनी त्याला खुनाच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले. दरम्यान, संशयित युवक हा गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून तुकारामवाडीतील मामा संजय देवराम पाटील यांच्याकडे राहत आहे. यातच गेल्या दोन ते तीन वर्षापूर्वी संशयित युवकाची संदिप वाणी याच्याशी ओळख झाली. त्यानंतर ते सोबतच फिरायचे. संशयित युवकाच्या मामाची अंडापावची गाडी असून त्यावर तो मामाला मदत करतो. तर शुक्रवारी संदिप सोबत मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमात गेल्यानंतर दोघांनी दारू प्राशन केली. त्यानंतर कट लागल्याच्या कारणावरून तरूणाला मारहाण केली व त्यात तो जखमी झाल्याचे त्याने चौकशीत पोलिसांना सांगितले.

झडतीत मिळाले फायटर
जिल्हा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन राठोड या खूनाच्या गुन्ह्याचा तपास करीत असून संशयितांची चौकशी करत असतांना त्यांच्या अंगझडतीत मारहाणीत वापरलेले फायटर त्यांच्याकडे मिळून आले असून ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, मारहाणीत वापरण्यात आलेला बांबू मिळून न आल्यामुळे पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, संशयितांना संशयितांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.