पुणे। कुमारी माता या सामाजिक समस्येवर थेट भाष्य करणार्या झरी चित्रपटाचा प्रीमियम शो शुक्रवारी पुण्यात रंगला. यावेळी विविध कलाकार आणि मान्यवर यांनी चित्रपटाचे कौतुक केले. यवतमाळ जिल्यातील झरी या गावात असलेल्या कुमारी मातांचा प्रश्न काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. सामाजिक संस्था संघटनांपासून ते थेट विधिमंडळापर्यंत या प्रश्नाची दखल घेण्यात आली होती. सिध्दीविनायक इन्फोमिडीयाची निर्मिती असलेला हा चित्रपट याच विषयावर आधारलेला आहे. कुमारी मातांच्या आयुष्याची राखरांगोळी कशी होते आणि त्याचे समाजावर काय परिणाम होतात यावर चित्रपटात भाष्य केलेले आहे.
चित्रपटाचे कौतुक
भोसले यांनी एक अत्यंत आगळावेगळा आणि सामाजिक भान असलेला विषय दिग्दर्शकाने हाताळला असल्याचे सांगत या चित्रपटाचे कौतुक केले. स्त्रियांच्या सशक्तीकरणावर यात प्रकाश टाकण्यात आला आहे. कुमारी मातांचा प्रश्न मोठा असून त्याकडे समाजाने लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. नव्या कलाकारांना संधी दिल्याबद्दल त्यांनी निर्माते आणि दिग्दर्शक यांचे विशेष कौतुक केले. अनेक मुली खोट्या भूलथापांना बळी पडून कुमारी मातृत्व लादून घेतात. यासाठी जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत चाकणकर यांनी मांडले. या चित्रपटात हा प्रश्न उत्तम पद्धतीने हाताळला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वच बाबतीत उत्कृष्ट
कडू यांनी बोलताना या समस्येवर ठोस पावले उचलणे महत्वाचे असल्याचा विचार व्यक्त केला. अनेक मुलींना अजूनही न्याय मिळणे बाकी असून त्यांच्यासाठी काम होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. एका दुर्लक्षित विषयाला हात घातल्याबद्दल त्यांनी दिग्दर्शकांचे अभिनंदन केले.राजेश आगळे यांनी केवळ कथाच नाही तर अभिनय, पार्श्वसंगीत,संगीत,संकलन या सर्वच बाबतीत झरी उत्कृष्ट असल्याचे मत नोंदवले.
मान्यवरांची उपस्थिती
शुक्रवारी रंगलेल्या प्रीमिअर शो साठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, नायिकेची भूमिका वठवणार्या पायल बावीस्कर, सहाय्यक दिग्दर्शिका अनुप्रिता कडू, राजेश आगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कृष्णकांत कुदळे, आदींसह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.