मुंबई – येत्या नोव्हेंबरपासून नृत्यावर आधारित शो ‘झलक दिखला जा’चा दहावा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत असून कलर्स वाहिनी ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोच्या अकराव्या सीझनसोबतच ‘झलक दिखला जा’ शोचीदेखील तयारी करत आहे. कलर्स ‘झलक दिखला जा’ या शोमध्ये एका अशा परीक्षकाला घेऊन येत असल्यामुळे तुम्ही दर आठवड्याअखेर हा शो आवर्जून पाहाल. जूही चावला, शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित आणि जॅकलिन फर्नांडिस यांसारखे बॉलिवूड कलाकार याआधी शोच्या वेगवेगळ्या सीझनमध्ये परीक्षक होते. पण आता बॉलिवूडची ‘हवा हवाई’ म्हणजेच श्रीदेवी परीक्षक म्हणून या दहाव्या सीझनमध्ये दिसणार असल्याचे वृत्त आहे.
छोट्या पडद्यावरील कलाकार, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील नावाजलेले व्यक्ती ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतात. कलाकार आणि कोरिओग्राफरची जोडी वेगवेगळे नृत्यप्रकार सादर करतात. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मते यांच्या आधारे दर आठवड्याला प्रत्येक फेरी जिंकत अखेर सर्वोत्तम नर्तक ‘झलक दिखला जा’ ही स्पर्धा जिंकण्याचा बहुमान प्राप्त करतो. आपल्या अप्रतिम नृत्यकौशल्यासाठी श्रीदेवी प्रसिद्ध आहे. श्रीदेवीचे पडद्यावरील नृत्य डोळ्याची पापणी लवू न देता पाहिले जाते. तिचे हावभावही प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतात. त्यामुळे परीक्षक म्हणून श्रीदेवीला पाहणे हे तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल.