झांझरिया, सरदारची ’खेलरत्न’साठी शिफारस

0

नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंह आणि पॅरालिंपिकपटू देवेंद्र झांझरिया या दोघांच्या नावाची क्रीडाक्षेत्रात सर्वोच्च असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. हॉकी इंडियाने आधीच खेलरत्न पुरस्कारासाठी सरदार सिंह याच्या नावाची शिफारस केली होती. क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा, महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, पॅरालिंपिकपटू मिरअप्पन थंगवेलू, वरुण भाटी, गोल्फपटू एसएसपी चौरसिया यांच्यासह 17 खेळाडूंची नावे अर्जुन पुरस्कारासाठी सुचवण्यात आली आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्रालय शिफारशी पाहून अंतिम निर्णय घेणार आहे.

सरदारसिंह पद्मश्रीनेही सन्मानित
सरदार सिंहच्या नेतृत्वाखाली भारताच्या हॉकी संघाने अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य तर जागतिक हॉकी लीग स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. आशियाई खेळांमध्ये पाकिस्तानचा अंतिम फेरीत पराभव करुन सरदार सिंहच्या नेतृत्वाखालील संघाने थेट रिओ ऑलिंपिकमध्ये प्रवेश मिळवला होता. सरदार सिंहला 2015 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रिओ येथे झालेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत देवेंद्रने हिंदुस्थानला सुवर्णपदक मिळवून दिले होते. या कामगिरीसाठी देवेंद्र झाझरिया याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्याची शिफारस करण्यात आली आहे.