महावितरण कंपनीने झाकणे बसवावीत
रावेत : महावितरण कंपनीच्या फीडर आणि रोहित्रांच्या बहुतांश ठिकाणचे डी.पी. हे धोकादायक ठरत आहेत. अनेक ठिकाणी डी.पी.ची झाकणे चोरीला जात आहेत. आता त्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या उघड्या राहणार्या डी.पी. धोकादायक ठरत आहेत. यातील उच्चदाबाच्या वीजवाहिन्या आणि तारा उघड्या पडल्या आहेत. परिणामी शॉर्टसर्किट होऊन किंवा अन्य कारणांनी अपघाताला निमंत्रण मिळू शकते. महावितरण आणि महापालिका यांच्याकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने याकडे लक्ष देऊन या डी.पी.ला झाकणे लावावीत अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
ठिकठिकाणी फीडर आणि डी.पी.
या डी. पी.च्या झाकणांच्या चोरीच्या समस्येने त्रस्त झालेल्या महावितरण कंपनीच्या अधिकार्यांनी या प्रकाराला आळा घालण्यासाठी नागरिक करीत आहेत. परिसरातील वीजेच्या खांबांवरील तारा भूमिगत केल्याची कामे मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाली आहेत. ती करताना ठिकठिकाणी फीडर आणि डी.पी. बॉक्स बसविण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणी या बॉक्सची झाकणे चोरीला जात आहेत. त्यामुळे भर नागरी वस्तीत असलेले अनेक बॉक्स उघडे दिसून येत आहेत. काही ठिकाणी किरकोळ अपघात झाले आहेत, तर काही ठिकाणी गंभीर अपघाताची भिती नागरिकांना वाटते आहे. विशेष करून लहान मुलांना सुरक्षिततेची चिंता मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.
अपघाताची शक्यता जास्त
परिसरातील रावेत, पुनावळे, वाल्हेकरवाडी, गुरूद्वारा चौक, बळवंतनगर, चिंचवडेनगर, बिजलीनगर आदी भागांमध्ये हे डी.पी. बॉक्स उघडे दिसून येत आहे. या भोंगळ कारभारामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. घरगुती वीजपुरवठा करण्याकरीता महावितरण कंपनीने मुख्य आणि अंतर्गत रस्ते अशा सर्व ठिकाणी भूमिगत वाहिन्या टाकून जागोजागी हे डी.पी लावले आहेत. काही ठिकाणी दरवाजे नाहीत तर काही ठिकाणी झाकणे तुटलेली आहेत. अशा परिस्थितीत अपघात घडण्याचे संभव जास्त आहेत.