नवी दिल्ली : दहशतवाद्यांशी संपर्क असल्याच्या आरोपावरून सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर आलेला त्यामुळे भारतातून फरार असलेला मुस्लिम समाजाचा वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईकला सौदी अरेबियाचे नागरिकत्व देण्यात आले आहे. सध्या झाकीर नाईक सौदी अरेबियामध्ये आहे.
नाईकची संस्था इस्लामिक रिसर्च फाउंडेशन म्हणजेच आयआरएफवर सरकारने बंदी घातली आहे. तसेच नाईकचे चॅनल पीस टीव्हीवर देखील बंदी घालण्यात आली आहे. चिथावणीखोर भाषण आणि देशविघातक कार्याला भाषणातून प्रोत्साहन दिल्याचा आरोप नाईकवर आहे. काही दिवसांआधी भारताने त्याच्या संस्थेवर बंदी आणल्यापासून तो सौदी अरेबियात आश्रय घेऊन आहे. एका दहशतवाद्याने आपण झाकीर नाईकच्या भाषणापासून प्रेरणा घेतल्याचे सांगितल्याने झाकीर नाईकवर कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
झाकीर नाईकने सौदी अरेबियाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. तो अर्ज मंजूर करण्यात आला आहे. इंटरपोलपासून बचावासाठी नाईकने सौदीच्या नागरिकत्वाचा आग्रह धरला होता, असे बोलले जाते. नाईकला सौदीचे नागरिकत्व मिळावे यासाठी सौदीचे राजे सलमान यांनी वैयक्तिक लक्ष घालून नाईकला नागरिकत्व दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) नाईकविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी करावी यासाठी तयारी सुरू केली होती. नाईकविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी झाल्यास त्याला फरारी समजून जगातील कोणतीही सुरक्षा यंत्रणा त्याला कुठूनही अटक करू शकते. त्यामुळे रेड कॉर्नर नोटीसची चाहूल लागताच नाईकनं सौदीच्या नागरिकत्वासाठी प्रयत्न सुरू केले होते. या सर्व घडामोडी एका आठवड्यात घडल्या आहेत.
झाकीर नाईक हा वादग्रस्त धर्मगुरू असून मुस्लिम तरुणांमध्ये तो खूप लोकप्रिय आहे. नाईकनं एमबीबीएस केलं असून तो एक उत्तम लेखक आणि वक्ता आहे. त्यांनी इस्लामिक रिसर्ज फाउंडेशन नावाची एक संस्था देखील स्थापन केली आहे. त्या संस्थेद्वारा पीस टीव्ही हे चॅनल चालवलं जातं. असं म्हटलं जातं की हे चॅनल जगभरात 100 कोटींपेक्षा अधिक लोक बघतात. फेसबुकवरही नाईक प्रसिद्ध आहे. फेसबुकवर त्याला 1 कोटी 14 लाख फॉलोअर आहे. नाईकवर ब्रिटन, कॅनडा, मलेशिया सह 5 देशामध्ये बंदी आहे.