झाझरिया, सरदार होणार खेलरत्न

0

नवी दिल्ली । अथेन्स आणि रिओ पॅरॉलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणारा देवेंद्र झाझरिया आणि भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदारसिंगला 29 ऑगस्ट रोजी साजर्‍या होणार्‍या क्रीडादिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद देशातील सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करतील. क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी अर्जुन पुरस्कार समिती आणि द्रोणाचार्य पुरस्कार समितीने शिफारस केलेल्या खेळाडूंच्या नावांची घोषणा केली. भारतीय क्रिकेटपटू चेतेश्‍वर पुजारा आणि हरमनप्रीत कौरसह 17 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी गेल्या शुक्रवारी अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कार समितीने शिफारस केलेल्या नावांना मंजुरी दिली होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यांच्या यादीतून सत्यनारायण यांचे नाव हटवण्यात आले. सत्यनारायण यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल असल्यामुळे त्यांचे नाव यादीतून वगळण्यात आले. तिघा जणांची आजीवन ध्यानचंद पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनात होणार्‍या कार्यक्रमात या किताब विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे. खेल रत्न पुरस्कार विजेत्यांना साडे सात लाख रुपये, अर्जुन आणि ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा पुरस्कार मिळेल.

सरदार सिंग आघाडीचा मिडफिल्डर
जगातील सर्वोत्तम मिडफिल्डर खेळाडूंमध्ये भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदारसिंगची गणना केली जाते. सरदारसिंगच्या नेतृत्वाखाली भारताने 2014 मधील इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून रिओ ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळवला होता. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने तब्बल 16 वर्षानंतर हे सुवर्णपदक जिंकले होते. 2008 मध्ये सरदार सिंगने मलेशियातील सुलतान अझलानशाह चषक हॉकी स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले होते. या स्पर्धेतील तो भारताचा सर्वात युवा कर्णधार ठरला होता.

विश्‍वविक्रमी देवेंद्र झाझरिया
36 वर्षीय देवेंद्र खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणारा पहिला पॅराऑलिम्पियन खेळाडू आहे. अथेन्स आणि रिओ ऑलिम्पिकमध्ये झाझरियाने एफ 46 गटात देशाला सुवर्णपदक जिंकून दिले आहे. राजस्थानचा असलेल्या झाझरियाने 2013 मधील आयपीएसी जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. 2004 आणि 2016 मधील पॅराऑलिम्पिकमध्ये झाझरियाने विश्‍वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते.

पुरस्कारांचे मानकरी
अर्जुन पुरस्कार
चेतेश्‍वर पुजारा, हरमनप्रीत कौर ( क्रिकेट), वरूणसिंग भाटी (पॅराखेळाडू), प्रशांती सिंग (बास्केटबॉल), एसएसपी चौरासिया (गोल्फ), ओनम बेमबेम देवी (अ‍ॅथलेटिक्स),साकेत मायनेनी (टेनिस), मरिअपन्न थंगावेलू(पॅरा खेळाडू), वीजे सुरेखा (तिंरदाजी), खुशबीर कौर(अ‍ॅथलेटिक्स), राजीव आरोकिया ( अ‍ॅथलेटिक्स), एस.वी. सुनील (हॉकी), सत्यव्रत कादियान(कुस्ती), एंथोनी अमलराज (टेबल टेनिस), पी.एन. प्रकाश (नेमबाजी), जसवीर (कबड्डी), देवेंद्रोसिंग (बॉक्सिंग),

द्रोणाचार्य पुरस्कार
दिवंगत डॉ. रामकृष्णन गांधी (अ‍ॅथलेटिक्स), हिरानंद कटारिया (कबड्डी).

द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार
जीएसएसवी प्रसाद (बॅडमिंटन), बृजभूषण मोहंती
( बॉक्सिंग), पी. ए. राफेल (हॉकी), संजय चक्रवर्ती (नेमबाजी), रोशनलाल (कुस्ती).

ध्यानचंद पुरस्कार
भूपेंद्रसिंग (अ‍ॅथलेटिक्स), सैय्यद शाहिद हकीम (फुटबॉल), सामुराई टेटे (हॉकी).