झाडं वाचवण्यासाठी पुणेकर रात्रभर झोपले झाडाभोवती

0

पुणे – सध्या सिमेंट काँक्रीटच्या जंगलात झाडांच्या सर्रास होणार्‍या कत्तलीमुळे पर्यावरणात तापमानाचा पारा बराच चढला आहे. पर्यावरणाचा र्‍हास थांबवण्यासाठी वृक्ष संवर्धनाची नितांत गरज बनली आहे. असे असतांना पुणे विद्यापिठालगतच्या रस्त्यांवरील मोठे वृक्ष तोडण्याचा घाट पुणे महापालिकेने घातला आहे. त्याच्या निषेधार्थ काल रात्रभर पुणेकरांनी या झाडांच्या खाली झोपून त्यांचे रक्षण केले, त्यामुळे पुन्हा एकदा चिपको मुव्हमेंटचे स्मरण या निमित्ताने झाले.

विद्यापीठालगत असलेल्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या वृक्षांचा अडथळा येत आहे. त्यामुळे हे सर्व वृक्ष तोडण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला. त्याप्रमाणे महापालिकेने कार्यवाहीदेखील सुरू केली. मात्र यामुळे पुण्यातील विशेषत: पुणे विद्यापीठानजीकच्या निसर्गसौंदर्यावर गदा येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी पुणेकरांनी उपरोक्त स्वरूपाचे अनोखे आंदोलन केले. याकरता विद्यापीठ परिसरात राहणार्‍या नागरिकांनी या झाडांच्या जवळच ठिय्या मांडून आंदोलन केले. रात्रभर या झाडांशेजारी झोपूनच त्यांचे संरक्षण केले.

पुणे महापालिकेकडून औंध आणि शिवाजीनगरला जोडणार्‍या रस्त्यालगचे मोठे वृक्ष तोडण्यास सुरुवात झाली. नागरिकांनी याला आक्षेप घेतला, मात्र तरीही महापालिकेने वृक्षतोड सुरूच ठेवली. अखेरीस या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर ही कारवाई थांबली. परंतु तरी महापालिकेचा ठेकेदार रात्रीत येऊन झाडं तोडू नये, यासाठी आसपासच्या सोसायटीत राहणारे लोक अंथरुण घेऊन या झाडांजवळ ठाण मांडून राहिले.

महापालिकेच्या उद्यान विभागाने तब्बल 23 मोठी झाडं तोडण्यास आणि अवघ्या सहा झाडांचे पुर्नरोपण करण्यास परवानगी दिल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.