बारामती । बारामती शहरातून फलटण, सातारा, इंदापूर, कोल्हापूर, बंगळूर व तमिळनाडूकडे जाताना रिंगरोड आहे या रिंगरोडला झाडामध्ये मराठी भाषेत दिशाफलक लावलेला आहे. हा फलक वाहनचालकांना दिसत नाही. तसेच हा फलक अत्यंत छोटा आहे. त्यामुळे वाहनचालक सरळ शहरात येतात. पुढे आल्यानंतर गर्दी आणि अस्ताव्यस्त असलेली वाहतूक व्यवस्था यामुळे त्यांची कोंडी होते.
रिंगरोडवरून वळताना मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेतून भलामोठा फलक असावयास हवा. या फलकासाठी भली मोठी जागाही आहे. पण अद्यापर्यंत मोठा फलक लावण्यात आलेला नाही. बारामती शहरात प्रवेश करताना जी पाच प्रवेशद्वारे आहेत या सर्व प्रवेशद्वारांवर अशा स्वरूपाचे फलक लावणे गरजेचे आहे. नगरपालिका याबाबतीत फारच उदासीन असल्याचे दिसून येते. एवढेच नव्हे तर शहरात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याचे दिसून येते.
वाहनचालक चुकतात रस्ता
शहराच्या विविध भागात जातानाही दिशादर्शक फलकाची कमतरता जाणवत असते. त्यामुळे बाहेरून येणार्या अनोळखी व्यक्तीला खूपदा लोकांना विचारपूस करत मार्ग शोधावा लागतो. त्यामुळे बर्याचदा चालक रस्ताही चुकतात. परिणामी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. नगरपालिका प्रशासनाने याविषयी तत्परता दाखवून दिशादर्शक फलक सर्वसामान्यांना दिसतील अशा ठिकाणी लावावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.