जळगाव । शाळा प्रवेशाच्या जाहीरातीच्या पाट्या खीळे लावून 27 झाडांवर ठोकल्याप्रकरणी संबधित शाळेला महापालिकेने सुमारे 1 लाख 35 हजार रुपये वसुलीची नोटीस पाठविली आहे. याबाबत 7 दिवसात खुलासा करण्याच्या सूचना नोटीसीमध्ये देण्यात आल्या आहेत. जळगाव शहरातील महाबळ परिसरात सिग्नेट स्कूलच्या प्रशासानाने शाळा प्रवेशाची जाहीरात असलेल्या पाट्या (डिजीटल फलक) सुमारे 27 जिवंत वृक्षावर खीळे ठोकून लावल्या होत्या. या प्रकारामुळे वृक्षांचे नुकसान होत असल्याने शाळा प्रशासनाला नोटीस देण्यात आली.
माजी स्थायी सभापती व महाबळ परिसरातीलच नगरसेवक नितिन बरडे यांनी याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. वृक्षांवर खीळे ठोकून जाहीराती लावल्याने वृक्षांचे नुकसान होत असल्याचे बरडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार महापालिकेच्या पर्यावरण विभागाने शाळेला नोटीस दिली आहे.पर्यावरण विभागाने या प्रकराची पाहणी केली असता, 27 वृक्षांवर खीळे ठोकून जाहीरातीच्या पाट्या लावल्याचे लक्षात आले. त्यामुळे प्रति वृक्ष 5 हजार रुपय या प्रमाणे 1 लाख 35 रुपये वसुलीची दंडात्मक कारवाई का करु नये ? अश्याआशयाची नोटीस पर्यावरण विभागाच्या शिफारशीनुसार उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी शाळा प्रशासनाला बजावली आहे. याबाबत 7 दिवसात लेखी खुलासा करण्याच्या सूचना देखील नोटीसीमध्ये देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळेला त्याबाबात खुलासा सादर करणे महत्वाचे आहे.