मुंबई:- मुंबई व परिसरातील महत्वाच्या चार पाच महानगरपालिकांनी आपापल्या क्षेत्रातील झाडे तोडण्याच्या तसेच पुनर्ररोपणाच्या सर्व परवानग्या देण्याच्या नोंदी तसेच प्रत्यक्ष झाडांच्या नोंदी जीओ टॅगिंगसह वेबसाईटवर टाकल्या पाहिजेत अशा सूचना देण्यात येत असून लवकरच ट्री अथॉरिटीची समग्र वेबसाईट तयार केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. या वेबसाईटवर प्रत्येक झाडासंबंधी माहिती अपलोड केली जाईल आणि फोटो अपलोड करून रिव्हिव घेऊन कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबई महापालिका क्षेत्रातील पंचवीस हजार झाडे गेल्या सहा वर्षात तोडली गेली पण त्यांच्या जागी दुप्पट झाडे मात्र लावण्यात आली नाहीत अशी तक्रार लक्ष्यवेधीद्वारे शिवसेनेचे भांडूपचे आमदार अशोक पाटील यांनी केली. त्यांना भाजपाचे आशीष शेलार, सुनील प्रभु आदिंनी जोरदार पाठिंबा देत चौकशीची मागणी केली. त्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ट्री अथॉरिटी वेबसाईट आणि जीओ टॅगिंगमुळे नेमके कोणते झाड कुठे पुन्हा लावले गेले तसेच ते जगले की नाही याचीही माहिती नागरिकांना घेता येईल.
सुनील प्रभु तसेच पाटील म्हणत होते की रस्ते वा अन्यविकासकामांसाठी झाडे तोडण्याची परवानगी दोन वर्षेही मिळत नाही मात्र मोठ्या बिल्डरांना रातोरात झाडे कापण्याच्या परवानग्या कशा दिल्या जातात? ट्री अथोरिटीमध्ये लोकप्रतिनिधी नसतात. तर आयुक्त व अन्य अधिकारीच असतात. झाडे कापण्याच्या तसेच मोठी झाडे उपटून पुन्हा दुसऱ्या जागी लावून जगवण्यात येतात याची खात्री करता येत नाही. हजारो झाडे तोडण्याने शहराच्या पर्यावरणाचा ऱ्हास होतो असेही प्रभु म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की झाडे उपटून नवीन जागी लावताना जर योग्य असल्याची काळजी घेतली तर ९० टक्के झाडे जगतात मात्र नव्या जागेतील माती योग्य नसेल तर ही पुन्हा लावलेली झाडे कमी प्रमाणात जगतात. त्यासाठी योग्य सल्लागारांचा सल्ला घेऊन आपण मेट्रो प्रकल्पातील झाडे पुन्हा लावण्याचे प्रयत्न करू तसाच योग्य सल्ला घेऊन बिल्डरांनीही झाडे पुन्हा लावावीत असेही ते म्हणाले.