झाडाची फांदी पडल्याने महिला गतप्राण

0

जळगाव : जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या आवारात असलेल्या जनकल्याण समितीच्या भोजन वाटप कक्षाजवळील सुकलेल्या झाडाची फांदी मंगळवारी दुपारी 11 वाजेच्या सुमारास अचानक कोसळल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दोन महिला जखमी झाल्या आहेत. दरम्यान, वारंवार निवेदन देवूनही झाड न कापल्याने आजचा प्रकार झाला असल्याचा आरोप करीत संतप्त जमावाने जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या दालनाची तोडफोड केली. यावेळी मोठा जमाव जमला होता. जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल होणार्‍या रूग्णांच्या नातेवाईकांना मोफत भोजन मिळावे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे दररोज उपक्रम राबविण्यात येत असतो. त्यासाठी रूग्णालयाच्या आवारातच एक स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे.

वाढदिवसानिमित्त चिवडा वाटप
जनकल्याण समितीमध्ये कार्यरत असलेल्या संगिता प्रविण सोनवणे (वय 32) रा.तुकाराम वाडी यांची मुलगी चिन्मयी (वय 7) हिचा सोमवारी वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संगीता या मंगळवारी रूग्णांच्या नातेवाईकांना चिवडा वाटप करणार होत्या. सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे प्रार्थना केली आणि त्या कक्षाच्या बाहेर आल्या.

एक मृत्यूमुखी तर दोघी जखमी
जिल्हा रूग्णालयात सिंधुबाई भास्कर पाटील (वय 70) रा.पाचोरा यांचा मुलगा रविंद्र हा तसेच सकीना चाँदखॉ तडवी (वय 40) यांची सून उपचारार्थ दाखल आहे. दोघीं जेवणाचे कूपन घेवून रांगेत जनकल्याण समितीच्या कक्षाबाहेर उभ्या होत्या. 11 वाजेच्या सुमारास संगीता या कक्षाबाहेर आल्या. याचवेळी जनकल्याण समितीच्या कक्षाजवळ असलेल्या सुकलेल्या झाडाची फांदी अचानक त्यांच्या डोक्यात कोसळली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला तर सिंधूबाई आणि सकीना या जखमी झाल्या. घटना घडताच इतर नातेवाईकांनी पळ काढल्याने ते बचावले.

मनपा कर्मचार्‍यांना रोखले
सुकलेले झाड कापण्यात यावे म्हणून दोन वेळा अर्ज देवूनही काहीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. मंगळवारी घटना घडताच मनपाचे कर्मचारी झाड कापण्यासाठी त्याठिकाणी दाखल झाले. यावेळी कोणाचा जीव गेल्यानंतर तुम्हाला जाग आली का? असे म्हणत संतप्त नातेवाईकांनी त्यांना रोखले. त्यांचीच कुर्‍हाड त्यांच्या अंगावर उगारण्यात आली.

शल्यचिकीत्सकांच्या दालनाची तोडफोड
घटना घडताच तुकारामवाडी परिसरातील महिला, पुरूष, तरूण मोठ्याप्रमाणावर जिल्हा रूग्णालयात जमा झाले. संतप्त झालेल्या जमावाने आराडाओरड करीत जिल्हा शल्यचिकीत्सक भामरे यांचे दालन गाठले. त्याठिकाणी गेल्यावर त्यांना फोन करून बोलविण्यात आले. परंतु 10 मिनीटानंतर त्यांचा फोन बंद आल्याने संतप्त झालेल्या जमावाने कॅबीनची तोडफोड केली. खुर्च्या, टेलीफोन, टेबल इतर मशीनची नासधूस करण्यात आली.

सासू भोवळ येवून कोसळल्या
सून संगीता हिचा मृत्यू झाले असल्याचे कळताच त्यांच्या सासू हिराबाई सोनवणे या भोवळ येवून कोसळल्या. मयत संगीता यांचे पती प्रविण सोनवणे हे रिक्षाचालक असून ते मंगळवारी एका खाजगी वाहनाने औरंगाबाद येथे जाणार होते. परंतु घटनेची माहिती मिळताच ते माघारी परतले. जिल्हा रूग्णालयात एकच आक्रोश केला होता.

अर्ध्या तासाने पोलीस दाखल
जिल्हा रूग्णालयात गोंधळ सुरू असतांना तब्बल अर्ध्या तासानंतर पोलीस हजर झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे हे हजर झाल्यानंतर काही पोलीस अधिकारी आणि मोठ्याप्रमाणावर फौजफाटा जमा झाला. सांगळे यांनी जमावाला शांत केले.