झाडाला धडक दिल्याने मोटरसायकलस्वार ठार

0

वरणगाव । आशिया महामार्गावर असलेल्या कडूनिंबाच्या झाडाला भरधाव वेगात येणार्‍या दुचाकीने धडक दिल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवार 19 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास आस्वाद हॉटेलसमोर घडल्याने वरणगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

रक्तस्त्राव झाल्याने झाला मृत्यू
विनोद प्रल्हाद न्हायदे (वय 40, रा. काळगाव, ता. चोपडा) हे रविवार 19 रोजी मुक्ताईनगर येथील नातेवाईक निलेश धोंडू धनगर यांची भेट घेवून रात्री 10 वाजेच्या सुमारास घरी जातो असे सांगुन विनोद हा स्वत:च्या मालकीची मोटरसायकल क्रमांक (एम.एच.19.ऐयू.0278) वरील मोटरसायकलवर मुक्ताईनगरकडून वरणगावकडे भरधाव वेगात व रस्त्याच्या परिस्थिकडे दुर्लक्ष करीत मोटरसायकल चालवीत घेवून जात असतांना वरणगावजवळील आस्वाद हॉटेलसमोरील लिंबाच्या झाडाला धडक दिल्याने विनोदच्या नाकातून व कानातून रक्तस्त्राव झाल्याने विनोदला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. निलेश धनगर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक जगदीश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल सुनील वाणी करीत आहे.