हडपसर। मुलांनी स्वतः कौशल्य आत्मसात करून राख्या तयार करणे, त्याचे प्रदर्शन व विक्री करणे, यातून व्यवसाय, रोजगार आणि आत्मविश्वास निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या कौशल्यावर आधारित कोर्सेस विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देत असतात, असे सांगून भावाने बहिणीचे रक्षण करावे. तसेच झाडांना राखी बांधून पर्यावरणाची काळजी घेणे ही अत्यंत नाविन्यपूर्ण गोष्ट आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणाबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासली जाते असे मत सामाजिक कार्यकर्त्या वर्षा तुपे यांनी व्यक्त केले.रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेजमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणोत्तर स्वनिर्मित राखी व फ्रेंडशिप बॅन्डचे प्रदर्शन व विक्री यांचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. भाऊसाहेब कराळे, प्राचार्य. बी. टी. जाधव, प्राचार्य. डॉ. अरविंद बुरुंगले, उपप्राचार्य डॉ. अशोक धुमाळ, प्रा. डॉ. वैशाली पाटील, डॉ. सुनंदा पिसाळ, प्रा. महादेव जरे, डॉ. शिल्पा शितोळे, डॉ. बेबी खिलारे, प्रा. गजानन घोडके, प्रा. व्ही. व्ही. देशमुख आदी उपस्थित होते.
रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून शॉर्ट टर्म कोर्सेस अतंर्गत विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या व फ्रेंडशिप बॅन्ड तयार केले. विद्यार्थ्यांनी अशा फ्रेंडशिप बॅन्ड व राख्यांचे प्रदर्शन व खरेदी करून आनंद लुटला. तसेच पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी, त्याचे जतन व्हावे यासाठी झाडाला राखी बांधून आगळावेगळा उपक्रम साजरा केला.