झाडावरून पडल्याने विद्यार्थी जखमी

0

जळगाव । शाळेत गेलेला विद्यार्थी वृक्षाच्या फांदीवर चढला, परंतु ती फांदी तुटल्याने विद्यार्थी जमिनीवर पडून गंभीररित्या जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी चावलखेडा येथील प्राथमिक शाळेत घडली. हा प्रकार लक्षात आल्यावर जखमी बालकास तत्काळ पिंप्री येथे हलवून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. नंतर त्यास अधिकच्या उपचारार्थ सिव्हीलमध्ये हलविण्यात आले.

सोमनाथ अहिरे हे कुंजर (एरंडोल) येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा अमोल (08) हा शिक्षणासाठी त्याचे मामा गणपत गायकवाड ( चावलखेडा)यांच्याकडे वास्तव्यास असून तो इयत्ता तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आज सकाळी अमोल नेहमीप्रमाणे शाळेत गेला. दरम्यान शाळेच्या मैदानावरवृक्षावर चढण्याचा मोह त्याला झाला. एका फांदीवर तो चढलेला असताना ती तुटली. त्यामुळे फांदीसह अमोल जमिनीवर आदळला. या घटनेत त्याला दुखापत झाली. ही घटना आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. प्रकार लक्षात येताच शाळेतील शिक्षक कर्मचार्‍यांनी अमोल यास उपचारार्थ पिंप्री (धरणगाव) येथे हलविले. नंतर त्यास सिव्हीलमध्ये हलविण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. अमोल याला मोठे दोन भाऊ असून विकास सहावीत तर दादू हा पाचवीच्या वर्गात कुंझर (एरंडोल) येथे गावी शिक्षण घेताहेत.