आदर्श सेवक कोण ? असा कोणी प्रश्न विचारला आणि त्याचे उत्तर जर ‘झाडू’ असे असेल तर तुम्हाला काय वाटेल ? झाडू कधी आदर्श सेवक असू शकेल काय ? आदर्श वाटावा असा कोणता गुण त्याच्यात आहे ? तो असं कोणतं महान आदर्शवादी काम करतो ? आदर्श असण्याची पात्रता तरी त्यांच्यात आहे काय ? वगैरे….!
झाडझुड करून साफसफाई केल्यानंतर आपण अंघोळ करतो, पुन्हा लागलीच झाडूला हात लावायचा म्हटला तर आपली हिम्मत होत नाही. मलिनता साफ करण्याचा त्याचा नैसर्गिक गुण असल्यामुळे त्याच्याबद्दलचा मलिनभाव आपल्या डोक्यात घुसलेला असतो, त्यामुळे झकपक पोषाख घालून तयार झाल्यावर आपण झाडुला हात लावायला धजावत नाही. झाडू उपेक्षित वाटत असला तरी ज्या ज्या वेळी घाण निर्माण होते त्या त्या वेळी तो त्याची सेवा करण्यासाठी तयारच असतो. तो स्वत: मलिन होतो पण ज्या हातांनी त्याला धरून ठेवले आहे त्यांना घाण लागू देत नाही. जेथे तुम्हाला जावेसे वाटत नाही तेथे तो हमखास पोहोचतो. जेथे तुमचा हात पोहचत नाही तेथेही पलंगाखाली, कपाटाखाली तो पोहोचतो. जागेच्या स्वच्छतेसाठी जसा झाडूचा उपयोग होतो तसाच मनाच्या स्वच्छतेसाठी साधनेचा उपयोग होतो. मनाच्या कोपर्यात दडून असलेले अनेक संस्कारांचे मळ साधनेच्या झाडूने स्वच्छ करता येतात. झाडूचा वापर संपला की आम्ही त्याला एका कोपर्यात फेकून देतो. खर्या अर्थाने त्याची उपेक्षाच करतो. तरीही पुन्हा कचरा गोळा झाला की हाच अभिमानरहित झाडू त्याला होत असलेल्या उपेक्षांची पर्वा न करता पुन्हा नव्या दमाने सफाई करण्यासाठी तत्परच असतो. घाण तुम्ही करायची आणि सफाई मात्र मी करायची असं तो कधीही म्हणत नाही. साधनेचेही तसेच आहे. षडविकारांनी ग्रस्त असे आमचे मन, संसार तापाने पोळून निघालेले असते. जन्मजन्मांतरीचे संस्कारांचा साठा झालेला असतो. हीच ती मलिनता असते जिच्या स्वच्छतेसाठी साधनारुप झाडूचा वापर करावा लागतो. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनात झाडूलाच लक्ष्मी मानतात. झाडूने धन आवरणारेही नशीबवान या जगात आहेत. अध्यात्माच्या दृष्टीने ‘धन’ ही एक घाणच आहे. धन मिळवून सुखी झालेला प्राणी जगतात कोणीही नाही. तरीही प्रत्येक जीव हेच धन अज्ञानतावश काळजीपूर्वक सांभाळून ठेवण्याचा कसोशिने प्रयत्न करीत असतो. असे लोक झाडूचा उपयोग घाण स्वच्छ करण्यासाठी न करता ही अधिक जमा करण्यासाठी करतात.
झाडूची हीच समानता विलक्षण आहे. तुम्ही स्वच्छ करा अगर साठवून ठेवा तो त्याच्या कामात तत्पर ! आम्हाला आमच्या विद्वत्ततेचा, प्रतिष्ठेचा, पदाचा, पैशाचा फार अभिमान असतो. इतरांच्या तुलनेत मी कोणीतरी श्रेठ, अद्वितीय, असामान्य, विद्वान, गुणवान, बुध्दिवान, साधक, कलाकार आहोत अशी समजूत करून घेत असतो. लहान-मोठ्याचा, ज्येष्ट कनिष्टाचा भेद करीत असतो. हाच तो मानसिक विकार आणि स्वच्छ न होणारा मल आहे. म्हणून झाडूलाच आदर्श मानून साधकाने आपल्या साधनेत रत रहावयास पाहिजे.
खेमराज खडके – 9423187848
योगगुरु, जळगाव