झाड पडून रिक्षाचा चुराडा

0

पुणे । एका रिक्षावर एकदम दोन झाडे पडल्याची घटना शनिवार पेठ येथे शनिवारी सकाळी घडली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, रिक्षाचा चुराडा झाला. वृद्ध महिलेची अडचण ओळखून रिक्षाचालक तिच्या मदतीला धावला आणि तो या दुर्घटनेतून बचावला.

महंमद इस्माईल शेख (वय 38) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. यात रिक्षेचा वरच्या भागाचा संपूर्ण चुराडा झाला. तसेच रिक्षेच्या पाठीमागील कारलाही थोडेफार नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच महापालिका कर्मचारी व अग्निशामक दलाचे जवान तेथे दाखल झाले होते. त्यांनी त्वरित झाडे बाजूला केली. या घटनेमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, मागील 24 तासात पुणे शहरात झाडपडीच्या 30 घटना घडल्या असून तीन दिवसात एकूण 50 घटना घडल्या आहेत. आतापर्यंत या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.