लोणावळा : मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर औंढे गावाजवळ भरधाव वेगात येणारी झायलो कार उलटून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका 13 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर अपघातात जखमी झालेली महिला उपचारादरम्यान दगावली, तर एकूण 12 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे जाणार्या मार्गावर हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली झायलो कार (एमएच 04 जीडी 438) भरधाव वेगात जात असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या बॅरिकेटला कारने जोरदार धडक दिली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातील सर्व जखमींना खंडाळा महामार्ग पोलीस, महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाचे आर्यन देवदूत पथक व आयआरबीचे कर्मचारी यांनी गाडीतून बाहेर काढत उपचारासाठी निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल केले आहे.