मुंबई: करोना व्हायरसच्या उद्रेकानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात अडकलेल्या झारखंडमधील कुटुंबांना मदत केल्याबद्दल मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. झारखंडच्या गरजू नागरिकांना अशीच मदत सुरू ठेवण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही सोरेन यांच्या या ट्विटला तात्काळ प्रतिसाद दिला. ‘तुम्ही निश्चिंत राहा. झारखंडमधील आमच्या बांधवांना आम्ही अवश्य मदत देऊ. ते आमचे कर्तव्यच आहे,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या भूमिकेचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे.
देशव्यापी लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेल्या मुंबईतील हजारो मजूर, कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आपापल्या राज्यात जाण्यासाठी या नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अशा परिस्थितीत प्रवास करणे धोकादायक असल्याने महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांना इथंच थांबण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांच्यासाठी शेकडो निवारा केंद्रांची सोय केली असून त्यांना जेवणही पुरवले जात आहे.