झारखंडमध्ये 1 रुपयात होणार रजिस्ट्रेशन

0

रांची । झारखंडमध्ये लहानसे का होईना, पण स्वत:चे हक्काचे घर किंवा संपत्ती खरेदी करणार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. संपत्ती खरेदी केल्यानंतर लागणारी स्टॅम्प ड्युटी आणि खरेदी शुल्क याची एकत्रित रक्कम ही लाखो रुपये असते. त्यामुळे अनेकांना स्वत:चे हक्काची संपत्ती करण्यास अडथळा निर्माण होतो. पण आता झारखंडमध्ये नागरिकांना, विशेषत: महिलांना काळजी करण्याची गरज नाही. झारखंडमध्ये महिलांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा निर्णय ऐकल्यानंतर कदाचित तुम्हालाही धक्का बसेल. महिलांच्या नावावर संपत्ती खरेदी करावी यासाठी सरकारने स्टॅम्प ड्युटी आणि खरेदी शुल्क जवळपास रद्दच केले आहे. म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तीने कुठलीही जमीन किंवा घर आपल्या पत्नी, आई, बहिणीच्या नावावर खरेदी केल्यास त्यांना रजिस्ट्रेशन चार्जेस म्हणून केवळ एक रुपया टोकन द्यावा लागणार आहे.

झारखंड सरकारचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी ही घोषणा केली आहे. ही घोषणा महसूल विभागासोबत झालेल्या बैठकीनंतर करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी महिलांना संपत्तीपासून दूर ठेवण्यात येते. महिलांनाही संपत्तीमध्ये वाटा मिळावा तसेच त्यांच्या नावावर संपत्ती असावी यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. झारखंड सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सरकारला खूप मोठे नुकसान होणार आहे. यामुळे राज्याच्या महसुलात घट होणार आहे. झारखंड सरकारला वर्षाला जमिनींच्या माध्यमातून जवळपास 150 ते 200 कोटी रुपये महसूल प्राप्त होतो. मात्र, आता या निर्णयामुळे या उत्पन्नात 50 टक्क्यांपर्यंत घट होण्याची चिन्ह आहेत.