नवापुर। निविदा प्रसिध्दी करुन जनतेची दिशाभुल व शासनाची फसवणुक केल्याबाबत फौजदारी किंवा न्यायिक चौकशी होणेबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी मल्लीनाथ कल्लशेटी यांना नवापुर विकास आघाडीतर्फे देण्यात आले आहे. त्यांनी निवेदना मध्ये म्हटले आहे की एका दैनिक वृत्तपत्रात शनिवार दि 8 ऑगष्ट 2017 रोजी नगर परिषद नवापुर यांनी अल्पमुदतीची निविदा प्रसिध्द झाली आहे. या निविदेतील अ.क्र 3 मध्ये सार्वजनिक हायस्कुल जवळील वाहतुकीस अडथळा ठरणारी 100 के.व्ही डी.पी शिफ्ट करणेबाबत निविदा मागविण्यात आलेली आहे. परंतु सदर डी.पी.मे महिन्यात शिफ्ट करण्यात आलेली आहे. यानंतर नगर परिषद कार्यालयात नवापूर विकास आघाडीतर्फे डी. पी. शिफ्टींगची विचारणा केली. तसेच निविदा फॉर्मची मागणी केली. यावेळी संदिप पारेख,मंगेश येवले,जितेंद्र अहिरे,अँड नितीन देसाई,धर्मेद्र पाटील,राहुल मराठे,रामु गिरासे आदी उपस्थित होते. या सर्वांनी याबाबत लेखी मागणी केली असता मुख्याधिकारी व कार्यालय अधिक्षक यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली व सदर निविदेचा अर्ज आमच्याकडे उपलब्ध नसल्याबाबत सांगितले. मात्र, दुसर्याच दिवशी सदर निविदेचे शुध्दीपत्रक 6 ऑगस्ट रोजी एका दैनिकामध्ये प्रकाशित झाल्याने सदर बाब ही अत्यंत संशयास्पद असल्याचे पदाधिकार्यांच्या लक्षात आले.
कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा
या कामासंबंधीचे लोकप्रतिनिधी नगर परिषदेच्या सभेत ठराव पारित झाल्याखेरीज निविदा बाहेर पाडणे हे कोणत्याही अधिकार्यास शक्य नसुन दैनिकात प्रकाशित करणे व त्यांसंबंधी अर्ज उपलब्ध नाही असे सांगणे ह्या सर्व घटना पुर्वनियोजित व षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. यामध्ये मुख्यधिकारी व कार्यालयीन अधिक्षक सोबत कोण आहेत याची चौकशी करा, अशी मागणी जिल्हाधिकार्यांना करण्यात आली आहे. निवेदनावर संदिप पारेख, मंगेश येवले, जितेंद्र अहिरे,राहुल मराठे, रामु गिरासे यांचा सह्या आहेत.