लोकाधार नसलेल्या ग्रेसीची स्वप्ने भंगली
ब्रिटनपासून स्वतंत्र झाल्यानंतर झिम्बाब्वेमध्ये रॉबर्ट मुगाबे झेएएनयू पार्टीकडून 1980 मधील निवडणुकांमध्ये यश मिळवत देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून निवडून आले. त्यानंतर अध्यक्ष बनून निवडणुकांमध्ये गैरव्यवहार करत त्यांनी तीन दशके सत्ता ताब्यात ठेवली. या काळात त्यांचे सूत जुळले ते आता त्यांची पत्नी असलेल्या ग्रेस या त्यांच्या पीएसोबत. हीच ग्रेस आता मुगाबेंची जागा घेण्यासाठी धडपडत आहे. दरम्यानच्या काळात 2016 मध्ये आर्थिक अस्थिरतेमुळे देशभरात निदर्शने झाली, आंदोलने पेटली. आता परवाच याची परिणती उपाध्यक्ष इमर्सन म्नांगग्वा यांच्या पुढाकाराने मुगाबे कुटुंबीयांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. हुकूमशाही प्रवृत्तीच्या मुगाबेंमुळे राजकीय क्षेत्रात नेता बनलेल्या लोकाधार नसलेल्या ग्रेसीची स्वप्ने त्यामुळे भंगली आहेत.
सत्तास्थान राखण्यासाठी हिंसा
लोकशाही मार्गाने निवडून आलेले सत्ताधीश हुकूमशाहीकडे वळतात आणि सत्ता सोडून देणे त्यांना अशक्य होते. एकदा का सत्ता मिळाली की नंतर निवडणुका होतात, पण एक चमत्कार घडतो तो म्हणजे लोकशाही मार्गाने हुकूमशहा बनलेला नेता आणि त्याची पार्टी विजयी बनत जाते. निवडणूक प्रक्रियेत आपल्याला फायदेशीर बदल करणे, निवडणूक अधिकार्यांना व कर्मचार्यांना वेठीस धरून मतदान स्वतःलाच कसे होईल त्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करणे ही निवडणुकांमधील दिव्य यशाची कारणे असतात. 1980च्या दशकात देशांतर्गत विरोधकांना दाबण्यासाठी मुगाबे यांनी उत्तर कोरियातून फिफ्थ ब्रिगेड बोलवली. हजारो विरोधकांची व त्यांना पाठिंबा देणार्या नागरिकांची हत्या करण्यात आली. या मोहिमेला शोना किंवा कचरा वाहून नेणारा पहिला पाऊस असे नाव देण्यात आले होते. मार्च 1990मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये अपेक्षेप्रमाणे मुगाबे व त्यांच्या झानू-पीएफ पार्टीला 120 पैकी 117 जागा मिळाल्या. इतके दिव्य यश मिळूनही लोकांमध्ये प्रचंड असंतोष होता. कामगार, शेतकरी, नर्स, डॉक्टर्स, व्यापारी, विद्यार्थी सर्वच नाराज होते. एचआयव्हीच्या संसर्गाने 25 टक्के लोक बाधित होते. त्याचाही आर्थिक उत्पादकतेवर दुष्परिणाम झाला होता. निवडणुकांमध्ये गैरप्रकार करून आलेल्या सत्तेत आलेल्या सत्ताधार्यांना बहुसंख्याकांची निदर्शने, संप आणि हिंसाचारालाही सामोरे जावे लागते. मुगाबेंना याचा मुकाबला करावा लागला आणि ते करण्यासाठी गैरलोकशाही हिंसेच्या मार्गानेच जावे लागले.
राजकीय निर्णय आणि अर्थव्यवस्थेचा र्हास
1990 च्या उत्तरार्धात मुगाबे यांनी जमीन सुधारणांकडे लक्ष दिले. मूठभर लोकांकडे देशातील सुपीक जमीन एकवटलेली होती. यात वर्णभेद होता कारण जमीनदार गोरे होते. त्यांच्या अनन्वित अत्याचारांनी काळे मजूर, शेतकरी जेरीस आले होते. मुगाबे यांनी कोणतीही दयामाया न दाखवता शीघ्र जमीन सुधारणा राबवत गोर्यांकडील जमिनी हिसकावून घेतल्या आणि जवळपास 60 हजार कृष्णवर्णीयांना शेती मिळाली. नगदी पिके घेण्यात कृष्णवर्णीय नवशेतकर्यांना अनुभव नसल्याने या प्रक्रियेत कृषी क्षेत्राचे निर्यातीतून मिळणार उत्पन्न घटले व त्याचा दुष्परिणाम कृषीआधारित अर्थव्यवस्थेवर झाला. लोकानुययी किंवा लोकांचे कल्याण करणारा निर्णय घेताना संभाव्य आर्थिक अस्थिरतेचे नियोजन न केल्याने मुगाबे सरकारला लोकक्षोभाला सामोरे जावे लागले. गोर्यांवरील अत्याचारांमुळे आणि निवडणूक व्यवस्थेत मतलबी बदल केल्यामुळे झिम्बाब्वेला राष्ट्रकुलातूनही हाकलण्यात आले. अमेरिका व अन्य आंतरराष्ट्रीय स्रोतांतून मिळणारा कर्जपुरवठाही बंद झाला. मदत पूर्ववत होण्यासाठी पाश्चिमात्यांच्या खासगी मालमत्ता जप्त करू, अशा धमक्याही मुगाबे यांनी दिल्या.
निवडणुकांचा फार्स
मार्च 2008 मधील निवडणुकीत मूव्हमेंट फॉर डेमोक्रेटिक चेंज या लोकशाही पक्षाने यश मिळवले होते. परंतु, निकालच मुळी दोन आठवडे राखून ठेवण्यात आला होता. वृद्धापकाळाने नियंत्रण गमावलेल्या मुगाबे यांनी झानू-पीएफ या त्यांच्या पक्षाच्या 2014 मधील अधिवेशनात भाषण करताना अनवधानाने सांगितले की, डेमोक्रेटिक चेंजने 73 टक्के मते मिळवली होती. लोकशाही प्रेरणा नसलेले सत्ताधारी कोणत्या थराला जातात हे यावरून स्पष्ट होते. मुगाबे दुर्बल होत गेले तशी झिम्बाब्वेची परिस्थिती सुधारू लागली. संयुक्त राष्ट्रांनी मानव अधिकारांच्या स्थितीबाबत 2013मध्ये समाधान व्यक्त केले. या वर्षीच अध्यक्षांच्या अमर्याद अधिकारांवर बंधने आणणारी नवी राज्यघटनाही तयार करण्यात आली. असे असले तरीही त्या वर्षी मुगाबे अध्यक्ष म्हणून निवडून आलेच. मूव्हमेंट फॉर डेमोक्रेटिक चेंजने या निवडणुकीला विरोध केला. हिंसाचारापेक्षा निवडणुकांमध्ये अफरातफर हा मार्ग सोयीस्कर ठरला किंबहुना विकसनशील राष्ट्रांमधील छद्मी लोकशाहीवादी नेते याच मार्गाचा अवलंब करू लागले आहेत.
ग्रेसचा उदय
ग्रेस मुगाबे यांची सचिव होती. त्यांचे प्रेमप्रकरण 1987 मध्ये सुरू झाले. त्यांना दोन मुलेही झाली, पण ते गुप्त ठेवण्यात आले होते. मुगाबे यांची पत्नी 1992 मध्ये निवर्तली. नंतर तिसरे मूल होण्याआधी 1996मध्ये या दाम्पत्याने नेल्सन मंडेला यांच्या उपस्थितीत शाही विवाह केला. ग्रेसला तिने प्रवेश घेतल्यानंतर तीन महिन्यांतच डॉक्टरेट देण्यात आली. पतीच विद्यापीठाचा पदसिद्ध कुलपती असल्याने अशी प्रगती साधता आली. ग्रेस झानू-पीएफ पार्टीच्या महिला आघाडीची प्रमुख झाली. तिचे महागडे कपडे खरेदी करणे, परदेश प्रवास करणे आणि जमिनीच्या डिल करणे यात सक्रिय असल्याबद्दल ख्याती आहे. तिला गुच्ची ग्रेस असेही म्हणतात.
ग्रेसची सत्ता
93 वर्षीय अध्यक्ष मुगाबे यांची जागा घेण्यासाठी त्यांची 41 वर्षांची पत्नी ग्रेस सरसावली आहे. अर्थात लष्कराला हे मान्य नाही. ग्रेस सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हळूहळू चमकू लागली. मुगाबेंचा कट्टर विरोधक असलेल्या उपराष्ट्रपती इमर्सन म्नांगग्वा यांना गेल्या आठवड्यातच पदावरून काढून टाकण्यात आले आहे. यात शॉपिंगचे व्यसन असलेली म्हणून हिणवल्या जाणार्या ग्रेसचा पुढाकार आहे, हे विशेष. ग्रेसीला रोखण्यासाठी व ग्रेसने पदावर हक्क सांगू नये म्हणून नुकताच लष्कराने सरकारवर ताबा घेतला आहे. मुगाबेंची राजवट संपल्याचे हे द्योतक आहे. दक्षिण आफ्रिका विद्यापीठातील शाद्राक गट्टो यांच्या मते ग्रेसची महत्त्वकांक्षा हुकूमशाहीचे दुष्टचक्र सुरू ठेवण्यास कारणीभूत ठरत आहे. जी 40 ही युवकांची संघटना हल्ले करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. तिचा पाठिंबा ग्रेसला मिळालेला आहे. लष्कराला ग्रेस मान्य नाही. त्यांनी तिच्या गटाच्या मंत्र्यांना आणि अनुयायांना लक्ष्य केले आहे. सरकारी वृत्त वाहिनीवर लष्कराचा ताबा आहे. त्यांनी गोड भाषेत राष्ट्राला सांगितलंय की घाबरू नका, मुगाबे यांच्याभोवती असलेल्या गुन्हेगारांवर आम्ही वचक ठेवत आहोत. त्यांना न्यायालयासमोर आणणार आहोत. लष्कराची धारणा आहे की त्यांना राष्ट्रपतींना मान्यता किंवा अमान्यता देण्याचा अधिकार आहे. झानू-पीएफ पक्षाचे अधिवेशन डिसेंबरमध्ये आहे. त्यात उपाध्यक्ष म्हणून ग्रेसची निवड होऊ शकते. त्याच्या आत लष्कराला हालचाली कराव्या लागणार आहेत. 2014 मध्येच गुच्चीने उपराष्ट्राध्यक्ष जॉईस मुजुरू यांच्याविरोधात प्रचार मोहीम राबवली. कारण अध्यक्षपदाचा दावेदार संपवण्याचा तिचा निर्धार होता. मुजुरूला पुढे झानू-पीएफ पक्षातूनही हाकलण्यात आले. म्नांगग्वा यांना संपवण्यात मात्र गुच्ची ग्रेसला अपयश आले. त्या प्रयत्नात मुगाबे आणि ग्रेस हरारेमध्ये नजरकैदेत जाऊन पडले आहेत, पण लोकांनाही त्याबद्दल राग नाही.
ग्रेसची हतबलता
ग्रेसची प्रतिमा जनमानसात चांगली नाही. ती प्रचंड संतापी आहे. मुलाबरोबर एका मॉडेलला पाहिल्यावर तिने हॉटेलमध्ये थयथयाट केला. मॉडेलवर हल्लाही केला. प्रसारमाध्यमांमध्ये ग्रेसचा उर्मटपणा आणि वर्तन गाजत असते. दक्षिण आफ्रिकेतील एका वृत्त वाहिनीवर तिने सांगितले की लोक मला काय म्हणतात त्याची पर्वा मला नाही. सत्ताधीश पाठीशी असल्याच्या मस्तीत मुगाबेंच्या ग्रेस या पीएने ताळतंत्र सोडत अनेकांना उद्ध्वस्त केले. आता सत्ताधीशाचा अस्त होत असताना तिची नशा उतरत आहे. लोलंगत नेत्यापेक्षा लोक पाठीशी लागतात हे तिला आता कळले आहेे. आता मुगाबे यांची प्रकृती खालावत आहे. ग्रेसचे सत्तेत येण्याचे प्रयत्न फलदायी ठरणे कठीण आहे. ती आता कुटुंबाच्या सुरक्षेविषयी विचार करत आहे. त्यांच्यासाठी सुरक्षित जागी स्थलांतरित होणे ती पसंत करेल. देशाबाहेर जाण्यासाठी तिला औपचारिकतांचे बंधन नाही. ग्रेसला मिळालेली ही सवलत अजूनही कायम आहे. देशाच्या राजकारणात 30 वर्षे उच्चस्थानी राहिलेल्यांना देश सोडून जाण्याची वेळ आली आहे. कारण झिम्बाब्वे आता नव्या युगात प्रवेश करत आहे.
– डॉ. सचिन पाटील
अभ्यासक, आंतरराष्ट्रीय घडामोडी, अलिबाग
9423893536