मुंबई-आनंद एल.राय दिग्दर्शित शाहरुख खानचा ‘झिरो’ चित्रपटाने चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. शाहरुख खान, अनुष्का शर्मा, कॅटरिना कैफ या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षकांना या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. पण सर्व अपेक्षा फोल ठरल्या आहेत. पहिल्या दिवशी चित्रपटाने २०.१४ कोटी कमावले. शाहरुख खानच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी २०.१४ कोटींची कमाई करणे हे फार समाधानकारक म्हणता येणार नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तरी या आकड्यात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. पण झाले वेगळेच, दुसऱ्या दिवशी गल्ला वाढण्याऐवजी घटतांना दिसला.
दुसऱ्या दिवशी चित्रपटाने केवळ १८.२२ कोटींची कमाई केली. पहिल्या दिवसाच्या तुलनेत शनिवारच्या कमाईत ९.५३ टक्के घट झाली.
आज रविवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ होणे अपेक्षित आहे. यानंतर नाताळच्या सुट्टीचाही चित्रपटाला फायदा होईल, असे मानले जात आहे. पण असे न झाल्यास येते दिवस या चित्रपटासाठी कठीण ठरू शकतात. कारण चित्रपट कुठलाही असो, रिलीजनंतरच्या ६ ते ७ दिवसांतच त्याचे पुढचे भविष्य ठरते. चित्रपट फ्लॉप आहे की हिट, याचा अंदाज येतो. त्यामुळे ‘झिरो’साठी येते दिवस कसोटी पाहणारे ठरणारे आहेत. त्यातच पुढच्या शुक्रवारी रणवीर सिंग व सारा अली खानचा ‘सिम्बा’ रिलीज होणार आहे. त्यामुळे ‘झिरो’ची वाटचाल आणखी कठीण होणार आहे.