जिल्हा परिषदेच्या सीईओंनी केली अधिकारी कर्मचार्यांची कानउघडणी
पुणे । जिल्हा परिषदमध्ये झिरो पेंडन्सीचे कामकाज सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी झिरो पेंडन्सीची अंतिम आकडेवारी हाती येण्यास विलंब लागत असून अधिकारी कर्मचारी अजूनही कामकाजात उदासीनपणा दाखवत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी आढावा बैठक घेतली. ज्या विभागातील झिरो पेंडन्सीची प्रकरणे अद्याप मार्गी लागली नाहीत, अशा अधिकारी व कर्मचार्यांची त्यांनी कानउघडणी केली. देसाई यांनी मंगळवारी बैठक घेऊन प्रलंबित प्रकरणांची माहिती घेतली. त्या निकाली काढण्यास काय अडचणी आहेत, याचा आढावा घेतला व संबंधित अधिकारी अथवा कर्मचार्यांची चांगलीच कानउघडणी केली. दरम्यान येत्या 17 सप्टेंबरपर्यंत सर्व फायली मार्गी लावण्याचे आदेशही दिले आहेत.
अधिकार्यांना प्रशिक्षण
जिल्हा परिषदेत झिरो पेंडन्सीचा प्रयोग राबविण्याचे आदेश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिले आहेत. त्या आदेशाच्या अंमलबजावणीला जिल्हा परिषदेत जोरदार प्रारंभ झाला आहे. विभागीय आयुक्त दळवी यांनी जिल्हा परिषदेतील प्रमुख अधिकार्यांना याबाबत प्रशिक्षण दिले. त्यानंतर जिल्हा परिषदेतील इतर अधिकार्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी प्रशिक्षण दिले आहे.
जुन्या प्रकरणांची छाननी
30 वर्षांपासूनच्या जुन्या प्रकरणांसह फाईल्सच्या छाननीचे काम हाती घेण्यात आले आहे. या फाईल्सचा कालावधी तपासून त्यांची गरज किती आहे, याची शहानिशा केली जात आहे. सर्व फाईल्सची छाननी करताना चार टप्प्यात त्याची वर्गवारी करण्यात येत आहे. कायमस्वरुपी, 30 वर्ष, 10 वर्ष आणि कायमच्या नष्ट कराव्या लागणार्या फाईल्स अशा चार टप्प्यात वर्गवारी सुरू करण्यात आली आहे. 10 ते 30 वर्षापर्यंतच्या फाईल्सची गरज पाहून त्यातील कोणत्या फाईल्स कायमच्या नष्ट करायच्या याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
सध्या झिरो पेंडन्सीचे काम अंतिम टप्प्यात असून जे काम शिल्लक राहिले आहे त्याबाबतचा अधिकारी व कर्मचार्यांकडून आढावा घेतला आहे. ते काम लवकरात लवकर पुर्ण करावे, अशा सूचना दिल्या आहेत.
– दौलत देसाई
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.
मुख्य कार्यकारी अधिकारी