बारामती । पुणे विभागात विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल अभियान राबविण्यात येत आहे. बारामती उपविभागीय कार्यालयात झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल अभियानांतर्गत डिसेंबर 2017 अखेर कार्यविविरण, विशेष नोंदवही, प्रलंबित 6,676 प्रकरणांपैकी 6,560 प्रकरणे निकाली काढण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली.बारामती उपविभागीय कार्यालयात मोहिम-1 मध्ये कार्यालयातील अभिलेखे, संकलन प्रमुखांच्या ताब्यातील व अभिलेख कक्षातील अभिलेखांचे अद्यावतीकरण करण्यात आले आहे. ए, बी, सी, सी-1, डी लिस्टप्रमाणे अभिलेखे जतन करून ठेवण्यात आले आहेत. कार्यालयातील प्रत्येक संकलनाचे दप्तर सहा गठ्ठे पद्धतीने लावण्यात आले असल्याचे प्रांताधिकारी निकम यांनी सांगितले.
अर्जावर एका महिन्यात कार्यवाही
मोहिम-2 मध्ये प्रत्यक्ष झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल कामकाज करण्यात आले. विभागीय आयुक्त, पुणे यांच्या सूचनेनुसार 31 ऑक्टोबर 2017 अखेरची प्रलंबित 405 प्रकरणे डिसेंबर अखेर पूर्णपणे निर्गत करण्यात आली आहेत. यापुढील काळात नागरीकांच्या अर्जावरील कार्यवाही कमीत कमी 1 महिना व जास्तीत जास्त 3 महिन्याच्या आत करण्यात येईल. प्रशासकीय काम पारदर्शकता, तत्परता व गतिमानता या त्रिसूत्रीच्या आधारे उपविभागीय पातळीवरून ते तलाठ्यांपर्यंत करण्याचा मानस आहे. सामान्य नागरीकांना केंद्रस्थानी ठेवून शिस्तबध्दपणे कामकाज करण्यावर भर देण्यात येणार आहे.