खासदार, आमदार, नगरसेवक अन् नागरिकांच्या समस्यांचा होणार वेळेत निपटारा
महापालिका आयुक्तांनी जारी केली परिपत्रक
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे खासदार, आमदार, नगरसेवक, राजकीय संघटनांचे कार्यकर्ते, अशासकीय व्यक्ती आणि नागरिकांनी केलेल्या तक्रारी, निवेदनांचा आता वेळेत निपटारा होणारा आहे. पालिकेकडे आलेल्या तक्रारी वेळेत निकाली निघणार असून किती कालावधी लागणार याची देखील माहिती तक्रारकर्त्यांना मिळणार आहे. वेळेत कार्यवाही न केल्याची तक्रार आल्यास संबंधित कर्मचार्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नुकतेच जारी केले आहे.
कर्मचार्यांची वृत्ती उदासिन
महापालिका प्रशासनातील विविध विभागांकडून लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांनी दाखल केलेल्या निवेदनांवर, तक्रारींवर वेळेत उत्तर दिली जात नाहीत. तक्रारी निकाली काढण्यास टाळाटाळ केली जाते. यावरुन अधिकारी व कर्मचार्यांची वृत्ती उदासिन, निष्काळजीपणाची, उर्मटपणाची निदर्शनास आली आहे. लोकाभिमुख प्रशासन संकल्पना राबविण्यात अशा अधिकारी व कर्मचार्यांचा अडसर निर्माण होत आहे. त्यामुळे झिरो पेंडन्सी अंतर्गत महापालिकेच्या विविध विभागांमधील दप्तर दिरंगाई रोखण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.
कारवाईचा इशारा
झिरो पेंडन्सी अंतर्गत लोकप्रतिनिधी अथवा नागरिकांकडून व्यक्तिश:, पोस्टाद्वारे किंवा ई-मेल अथवा अन्य माध्यमातून महापालिका विभागांना प्राप्त झालेल्या पत्रव्यवहाराला प्राधान्याने निकाली काढण्यात याव्यात. सर्व पत्रव्यवहाराला प्रथम प्राधान्यक्रम देण्यात यावे. संबंधित निवेदन अथवा तक्रार किती दिवसांत सोडविली जाऊ शकेल, याची माहिती संबंधित नागरिकाला कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कामात हलगर्जीपणा करणा-या विभागाबाबत तक्रारी आल्यास संबंधित अधिकारी व कर्मचार्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. सर्व विभागप्रमुखांनी या परिपत्रकाची त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावे. या सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन करावे, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.