किनगावात वनविभागाची कारवाई ; तस्करांमध्ये खळबळ
यावल :– तालुक्यातील किनगाव येथे झाडा-झुडूपांमध्ये लपवलेले व सुमारे 70 हजार रुपये किंमतीचे सागवान लाकूड यावल वनविभागाने जप्त केले. मंगळवारी सकाळी झालेल्या या कारवाईने लाकूड तस्करांमध्ये खळबळ उडाली तर आरोपी मात्र मिळून आले नाहीत.
गुप्त माहितीवरून कारवाई
यावल वनविभागाच्या स्ती पथकाचेे वनक्षेत्रपाल एस. आर. पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मंगळवारी सकाळी 10 वाजता वनरक्षक एस.एस.माळी, जगदीश ठाकरे, संदिप पंडीत, संदीप भोई, समीर तडवी व योगीराज तेली यांनी पथकासह किनगावात ठिकठिकाणी तपासणी केली. त्यात गावातील लेंडी नाल्यात झाडा- झुडुपांमध्ये सागवान लाकडाचे कट साईज लाकुडच्या रिफा, पाट्या व कटसाइज असे एकुण 660.21 घनमीटर सागवान बेवारस मिळून आले. या सागवानाची किंमत सुमारे 70 हजार रूपये आहे. जप्त केलेला मुद्देमाल यावल उपवन केंद्रात जमा करण्यात आला. किनगावात मोठ्या प्रमाणावर अवैध सागवान लाकडाचा उद्योग आहे. सातपुड्यातून चोरट्या मार्गाने लाकूड येथे काही फर्निचर व्यावसायी घेतात व फर्निचर तयार करून जिल्ह्यासह राज्यभरात पोहचवतात. वनविभागाच्या कारवाईमुळे लाकूड तस्करांमध्ये खळबळ उडाली.