धुळे । शहरात सुरु असलेल्या विकास कामांतंर्गत पांझरा नदीवर झुलता पूल उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपुजन येत्या 31 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे.यासाठी भाजपा नेते आणि मंत्री धुळ्यात येणार असून त्यांच्या जाहीर सभेत पुढील विकास कामांची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती शहराचे आमदार अनिल गोटे यांनी प्रसिध्द पत्रकाव्दारे दिली आहे.
विविध विकासकामांची होणार घोषणा
पत्रकांत आ. गोटे यांनी म्हटले की, भाजपा सरकारने धुळे शहराच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यातून जुने धुळे भिलाटी ते स्मशान भूमी असा काजवे व रस्ता आणि पांझरानदीच्या दोन्ही काठावर भूमिगत गटार योजना करुन सांडपाणी शहराच्या बाहेर वाहून नेण्यात येणार आहे. तसेच दोन्ही रस्त्यांवर देवपुर परिसर व धुळे शहराकडून येणारे एकूण 54 रस्ते जोडले जाणार आहे. शहरातील पांझरा नदीत बाराही महिने स्वच्छ पाणी राहिल. असे नियोजन केले असून त्यासाठी 14 कोटी व 12 कोटी असे एकूण 26 कोटी रुपये मंजूर झाले आहे. अर्थ संकल्पापुर्वी ही रक्कम बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत केली जाणार असून या रकमेतून साकारणार्या झुलत्या पुलाचे भूमिपुजन पांझरा नदी काठी असलेल्या गणपती मंदिरामागे अग्निशमन सेंटर समोरच्या पटांगणात केले जाणार आहे. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते भूमिपुजन होईल. यावेळी जाहीर सभा ही आयोजीत केली असून विकास कामांची घोषणा करण्यात येणार आहे.