झूलन गोस्वामीची कहाणी पडद्यावर

0

मुंबई । मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या जीवनावर आधारित सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याच सिनेमांनी प्रेरित होऊ आता महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी भारतीय खेळाडू झूलन गोस्वामीची कहाणीही लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. या सिनेमाचं नाव ‘चाकदह एक्स्प्रेस’ असे ठेवण्यात आलं आहे. या सिनेमात झूलनच्या गावापासून ते 2017 च्या विश्वचषकातील लॉर्ड्सच्या मैदानापर्यंतचा प्रवास दाखवला जाणार आहे. दरम्यान भारतीय महिला संघाच्या हातातून 2017 चा विश्वचषक थोडक्यात निसटला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन सुशांत दास करणार असून सुशांत दास यांनी या अगोदर एका बंगाली सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे.

सिनेमाचं नाव ‘चाकदह एक्स्प्रेस’
लवकरच या सिनेमाच्या पटकथेवर काम सुरु करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सिनेमाची शुटिंग चाकदाह ते लॉर्ड्सपर्यंत होणार आहे. झूलनची भूमिका साकारण्यासाठी बॉलिवूडमधील मोठ्या अभिनेत्रींशी चर्चा सुरु आहे. मात्र करार न झाल्यामुळे आत्ताच कुणाचंही नाव सांगता येणार नाही, अशी माहिती सुशांत दास यांनी दिली. या सिनेमामुळे तरुणांना प्रेरणा मिळण्यास मदत होणार आहे. सचिन आणि धोनीचा बायोपिक पाहिला. मात्र महिला क्रिकेटरच्या जीवनावर आधारित हा पहिलाच सिनेमा आहे. झूलनने ज्या ठिकाणी क्रिकेट खेळलं आहे, त्या प्रत्येक ठिकाणी शुटिंग केली जाणार असल्याचे सुशांत दास यांनी सांगितले. झूलनने 164 वन डे सामन्यांमध्ये 195 विकेट्स घेतल्या आहेत. महिला वन डे क्रिकेटच्या इतिहासात एवढ्या विकेट घेणारी ती एकमेव क्रिकेटर आहे. एका छोट्या गावातून लॉर्ड्सपर्यंत पोहोचण्याचा संघर्षमय प्रवास लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.