झेडपीत फायलींचे अद्ययावतीकरण!

0

ठाणे । गेल्या अनेक वर्षापासून ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध विभागात असणारे कार्यालयीन दस्तावेज आता अद्यायवत करण्याची प्रक्रिया जलद गतीने सर्वच विभागांमध्ये सुरु आहे. एका बैठकीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी अभिलेख वर्गीकरणाच्या सूचना सर्व विभागप्रमुख तसेच गट विकास अधिकारी यांना दिल्या. तसेच झिरो पेंडन्सी अ‍ॅड डेली डिस्पोजल अर्थात ‘शून्य प्रलंबितता आणि दैनिक निर्गती’ या कार्यालयीन पद्धतीचा अवलंब करण्याची सूचनाही केली होती. त्यानुसार हा उपक्रम सुरु करण्यात आला असून 10 नोव्हेंबर पर्यंत अभिलेखांचे वर्गीकरण पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाअंतर्गत या उपक्रमाची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेचे कर्मचारी अभिलेखांचे वर्गीकरण व अद्ययावतीकरण करण्याच्या कामात गर्क आहेत.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या आदेशानंतर फायलींचे झीरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोझल ठाण्यातही सुरू शासकीय कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात वर्षानुवर्षे अभिलेख (फायली) साठून राहतात. त्यामुळे कार्यालयीन उपयोगासाठी जागा अपुरी पडते. परिणामी प्रलंबित प्रकरणी कामाचा शोध घेणे आणि ती निर्गत करणे अवघड होते. परंतू या पद्धतीमुळे आता दैनंदिन कामाचा निपटारा करणे सोपे होणार आहे. अनेक वर्षापासून अस्ताव्यस्तपणे पडून राहिलेले दस्तऐवज आता अद्यावत करून अभिलेख कक्षामध्ये पाठवण्याचे काम करण्यात येत आहे. प्रत्येक विभागाच्या प्रमुखांनी आपापल्या विभागात या उपक्रमाबाबत कर्मचार्‍यांना सूचना केल्या असून जलदगतीने या कामाला गती मिळाली आहे. या उपक्रमामुळे शासकीय कामाचे व्यवस्थापन करणे, अभिलेख जतन करणे, गोषवारे व्यवस्थित ठेवणे आदी काम वेळीच पूर्ण होऊन नागरिकांच्या व प्रशासकीय कामकाजात होणारा विलंब टाळला जाणार आहे. सोबतच सर्व थकीत प्रकरणाचा निपटारा वेळेवर होण्यास मदत होणार असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) चंद्रकांत पवार यांनी सांगितले.

25 हजार फायलींचे जतन
ठाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत अभियान काळात कार्यालयात असलेल्या अभिलेखाच्या एकूण 14 हजार 554 फाईल्स अभिलेख कक्षात पाठविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या असून यापूर्वी अभिलेख कक्षात असलेल्या व अभियान काळात तयार केलेल्या अशा एकूण 25 हजार फाईल्सचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे.

अधिकारी घेत आहेत दैनंदिन आढावा
महत्त्वाकांक्षी असणार्‍या या उपक्रमाला ग्राम विकास विभागाच्या मंत्री पंकजा मुडे या स्वत: या उपक्रमासाठी आग्रही आहेत. त्या राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचा आढावा सोशल मिडीयाच्या माध्यमातून घेत आहेत. ठाणे जिल्ह्यातही जिल्हा परिषदेचे सर्व विभाग आणि पाच पंचायत समित्यामध्ये अभिलेख वर्गीकरणाच्या कामाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार हे सातत्याने आढावा घेत असून उप मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्व विभागाचे अधिकारीही अभिलेख वर्गीकरणाच्या कामाबाबत दैनदिन आढावा घेत आहेत.