जळगाव। जिल्ह्यात भाजपच्या उभारणीसाठी अनेकांनी परिश्रम घेतले. विशेषत: एकनाथराव खडसे व गिरीष महाजन यांचे मोठे योगदान आहे. पुर्वी देशासह राज्यात विरोधी पक्षाच्या भुमिकेत भाजप होता. विरोधी बाकावर असतांना भाजप कार्यकर्ते गुण्या गोविंदाने नांदत होते. मात्र देशासह राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळाली. त्यानंतर जिल्ह्यात भाजपत अंतर्गत कुरघोडी सुरु झाली. पक्ष उभारणीसाठी ज्यांनी परिश्रम घेतले तेच आज श्रेयासाठी झगडत आहे. खडसे व महाजन हे दोन गट सक्रीय असल्याचे दोन वर्षातील अनेक घडामोडीत दिसून आले. खडसे यांची ताकद कमी करण्याचे प्रयत्न होत असल्याचे आतापर्यत दिसून आले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने पहिल्यांदा एकहाती सत्ता मिळविली. मात्र अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती निवडणुकीवरुन पुन्हा दोन गट सक्रीय असल्याचे दिसून आले. मागील पंचवार्षिकमध्ये दोन्ही अध्यक्ष महाजन गटाचे होवून गेल्याने यावेळी संधी खडसे गटांला मिळणार हे जाहीर होते. अध्यक्ष खडसे गटाचा झाला. मात्र उपाध्यक्ष महाजन गटाचा झाला. सभापतीपदाच्या निवडीत पुन्हा पक्षांतर्गत कुरघोडी झाल्याचे दिसुन आले. सभापती निवडणुकीत महाजन गटाचे वर्चस्व सिध्द झाले.
पक्षांतर्गत कलह: भाजप पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर येऊन पक्षाची प्रतिमा मलीन होवू नये म्हणून दोन्ही गटातील कार्यकर्ते काळजी घेतात परंतु अनेकवेळा हा वाद चव्हाट्यावर आलेला दिसुन येतो. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुध्द घोषणाबाजी केल्याचे प्रकार घडले आहे. कॉग्रेसच्या एका सदस्याला सभापतीपद देण्यावरुन नाही तर कोणाला द्यावे यावरुनदेखील भाजपात अंतर्गत मतभेद झाले होते. अध्यक्ष निवडीप्रसंगी दोन्ही गटाचे कार्यकर्ते भाजपा कार्यालयात हजर होते. मात्र सभापती निवडणुकीनंतर खडसेसह त्यांच्या गटातील कार्यकर्ते, नेते अनुपस्थित राहिल्याने पक्षांतर्गत कलह असल्याचे दिसून आले.
सभापती महाजन गटाचे
महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी रजनी चव्हाण निवृत्त अभियंता जगन्नाथ चव्हाण यांच्या पत्नी आहे. जगन्नाथ चव्हाण हे गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. प्रभाकर सोनवणे दिवंगत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भिला गोटु सोनवणे यांचे बंधु असून त्यांना पक्षात आणण्यासाठी महाजन यांची भुमिका महत्वाची होती. चाळीसगाव तालुक्यातील पोपट भोळे यांची आमदार उन्मेश पाटील यांच्याशी जवळीक आहे. उन्मेश पाटील हे गिरिष महाजनांचे निकटवर्तीय मानले जातात. भाजपाला कॉग्रेसने पाठींबा दिला असल्याने कॉग्रेसला एक सभापतीपद मिळणार होते. अरुणा पाटील यांना सभापतीपद दिले जाणार असल्याचे बोलले जात होते मात्र ऐनवेळी महाजन गटातील दिलीप पाटील यांची विषय समिती वर्णी लागली हे चौघेही नामदार गिरिष महाजन यांच्या गटातील आहे.
अध्यक्ष खडसे गटाचा
नगरपालिका व त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही गटांनी आपले वर्चस्व सिध्द करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषद अध्यक्षपदावरुन देखील दोन्ही गटात जोरदार रस्सीखेच सुरु होती. माजी उपाध्यक्ष व शिवसेनेतुन भाजपात दाखल झालेले मच्छिंद्र पाटील हे खडसे गटाचे मानले जातात. त्यांच्या पत्नी उज्ज्वला पाटील यांना अध्यक्षपद देण्यात आले .