झेडपी आणि नगरपंचायतीत कारवाई ढेपाळली

0

मुंबई (राजा आदाटे)। राज्यसरकारकडून निवडणूक आयोगाच्या कर्मचार्‍यांवर दबाव आणला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात असून नगर पालिकेंच्या निवडणुकीनंतर पार पडलेल्या महापालिका, जिल्हापरिषदा आणि पंचायतसमित्यांच्या निवडणुकीतील प्रकरणांची संख्या त्यामुळेच रोडावली असल्याचे बोलले जात आहे. मिनीविधानसभा मानल्या जाणार्‍या महापालिकेंच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने धडक कारवाई करत मोठया प्रमाणात रोकड जप्त केली होती. शिवाय अवैद्य शस्त्र, अवैद्य दारूसाठा, अशा अन्य कारवायांचा वेग वाढवला होता. मात्र त्यानंतरच्या पुढील काही निवडणुकीत याच कारवाईचा वेग मंदावला गेला.

या बाबत सत्ताधारी पक्षाकडून आस्ते कदम घेण्यासाठी दबाव येत असल्याच्या स्थानिक निवडणूक कर्मचार्‍यांनी तक्रारी केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. नोटाबंदीनंतर अवघ्या काही दिवसातच पार पडलेल्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणूकीत निवडणूक आयोगाने धडक कारवाई करत तब्बल 26 कोटी रूपयांची रोकड जप्त केली होती. नगरपालिकांच्या तुलनेत मोठा आवाका असलेल्या त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणूकीत पैशांचा अक्षरशःपाऊस पडल्याचे चित्र असताना यावेळी केवळ 75 लाख 66 हजार 980 रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. यामुळे संशयाला जागा निर्माण झाल्याचे सुत्रांनी सांगितले. गेल्या सहा महिन्यात राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतीं, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये 212 नगरपालिका आणि नगरपंचायती, 25 जिल्हा परिषदा, 282 पंचायत समित्या आणि 13 मोठया महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या.

नगरपालिकांनंतर झालेल्या निवडणूकीत पैसे वाटपा बाबत सत्ताधार्‍यांकडून आस्ते कदमम घेण्याच्या सुचना किंवा दबाव आल्याच्या तक्रारी स्थानिक निवडणूक यंत्रणेने निवडणूक आयोगाकडे केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रोकड जप्तीच्या कारवाईचा आलेख ढासळल्याचे उपलब्ध तपशिलावरून दिसून येते. सध्या राज्यातील पनवेल, भिवंडी-निजामपूर आणि मालेगाव महापालिकेच्या निवडणूकीची धामधूम सुरू आहे. या ठिकाणी देखिल पैसा आणि दारूचा महापूर वाहणार असल्याचे संकेत निवडणूक आयोगाला मिळाले आहे. त्यामुळे कुणाच्या दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने स्थानिक यंत्रणेला दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. कायदा व सुव्यवस्थेबाबत कार्यवाही

नगरपालिका निवडणुका
प्रतिबंधात्मक कारवाई – 28,714
नाकांबदी – 4718
अवैध शस्त्र जप्त – 11
रोकड जप्त – 26 कोटी 4 लाख 47 हजार 250 – (प्रकरणे41)
अवैध दारू जप्त – 1 लाख 24 हजार 336 लीटर – (प्रकरणे 2520)
आचारंसहिता भंग प्रकरणे – 69
मालमत्ता विद्रुपीकरण – 30
तडीपार – 3173

झेडपी, पंचायत समित्या आणि 13 महापालिका निवडणुका
प्रतिबंधात्मक कारवाई-54,025
नाकाबंदी- 9,700
अवैध शस्त्र जप्त- 211
रोकड जप्त- 75,66,980 (प्रकरणे 17)
अवैध दारू- 6,81,556 लीटर (प्रकरणे 10,898)
आचारसंहिता भंग प्रकरणे- 338
मालमत्ता विद्रुपीकरण- 77
तडीपार- 371