झेडपी स्थायी समितीत जमा खर्चास मंजुरी

0

जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ऑगस्ट ते सप्टेबर या महिन्या अखेरच्या शासकीय व अभिकरण योजनेच्या जमा खर्च मंजूरीचा विषय स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला. सभेत ऑगस्टचा जमा 13647.27 लाख आणि खर्च 4818.07 लाख रूपये आणि सप्टेंबरचा जमा 14040.18 लाख व खर्च रक्कम 6333.04 लाख रूपयांना मंजूरी देण्यात आली. जिल्हा परिषदेत अध्यक्ष प्रयाग कोळी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती.

चाळीसगाव तालुक्यातील हातेड बु. येथील जिल्हा परिषद शाळा इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 41.12 लाख रूपये इतक्या निविदेस समितीने मंजूरी दिली. अमळनेर तालुकयातील पाडळसे गाव शंभर टक्के हागणदारी मुक्तीच्या मार्गावर असून प्रशासनाने गाव हागणदारी मुक्त करण्याच्या दृष्टीने थोडे प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ज्या प्रमाणे अधिकारी आर्थिक निकषाचे काटेकोर पालन करतात तसेच लोकहितासाठी ही काम करावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्यांनी केले. त्याचप्रमाणे हा नियम सर्वच विषयांना लागु करण्याची मागणी देखील करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर आमले, सभापती सुरेश धनके, मिना पाटील, दर्शना घोडेस्वार, निता चव्हाण, अशोक कांडेलकर, प्रकाश सोमवंशी, प्रभाकर सोनवणे, ऍड. व्ही. आर. पाटील, विजय पाटील, राजेंद्र चौधरी, संजय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कुटे आदी उपस्थित होते.