झेड.पी.तील असुविधेविषयी कर्मचार्‍यांची तक्रार

0

जळगाव । मंगळवारी 8 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेत तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांनी यावेळी समस्या मांडल्या. यात झेड.पी.तील असुविधेविषयी कर्मचार्‍यांनी तक्रार मांडली. यात महिला सदस्य कक्ष, महिला कर्मचारी कक्ष, हिरकणी कक्षाची देखभाल केली जात नाही यासंबंधी तक्रार करत साफसफाईसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करावा, कर्मचारी, अधिकारी वर्गासाठी स्वतंत्र लायब्ररी, कॅन्टीन, कॅशलेस व्यव्हारासाठी एटीएमला जागा उपलब्ध करून देण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. तसेच गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली पदोन्नती, प्रतिनियुक्त्या वेळेवर करण्यासह अनुकंपावरील पदे भरावीत, कर्मचार्‍यासाठी सेवासुविधा तसेच कार्यालय परिसरात कॅन्टीन, एटीएम, झेरॉक्सची व्यवस्था करावी अशी मागणी केली.

समस्या सोडवण्याचे आश्वासन
जिल्हा परिषदेमधील अनेक विभागांमध्ये कर्मचार्‍यांचे स्थांनातर नियमाप्रमाणे होत नसल्याने ते अनेक वर्ष कार्यमुक्त होत नाहीत. अनेक विभागात कर्मचारी सोईसाठी अनधिकृतरित्या कार्यरत आहेत. त्यांच्यासह इतर चुकीचे झालेले आदेश त्वरीत रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. टपाल आवक-जावकसाठी संगणक द्यावा, संगणकासह विविध बदलांबाबत प्रशिक्षण देण्याचीही मागणी करण्यात आली. लिपीक वर्गीय संघटनेसह अन्य विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यानी आपल्या समस्या, तक्रारी मांडल्या. अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजन पाटील बैठकीला उपस्थित होते.
जिल्हा परिषदेत पद भरती करतांना एकुण जागेच्या 10 टक्के जागेवर अनुकंप तत्वावर पदभरती करण्यात येत असते. मात्र गेल्या दोन वर्षापासून अनुकंपावरील भरती प्रक्रिया रखडली असून अनुकंपावरील उमेदवार वारंवार चकरा मारतांना दिसत आहे. अनुकंपावरील पदभरती लवकरच भरती प्रक्रिया करून 13 जणांना रुजु करुन घेण्यात येणार आहे.